परात्पर गुरु डॉक्टरांनी पत्रलेखनातून कृतज्ञता शिकवणे

विविध प्रसंगांतून ‘कृतज्ञता कशी असायला हवी ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांनी ह.भ.प. तुळशीदास पोखरकर महाराज (एरंडोल, जि. कोल्हापूर) यांना लिहिलेले कृतज्ञतापर पत्र

ह.भ.प. तुळशीदास वि. पोखरकर महाराज

।। श्री ।।
ह.भ.प. तुळशीदास वि. पोखरकर महाराज यांस,
स.न.
आपण १७.१.२००८ या दिवशी कोल्हापूर येथे झालेल्या धर्मजागृती सभेच्या संबंधाने पाठवलेले कृतज्ञता व्यक्त करणारे भावपूर्ण पत्र वाचले. ते ‘दैनिक सनातन प्रभात’ला प्रसिद्ध करण्याची विनंती केली आहे. खरे म्हणजे आपण आणि आपल्यासारख्या इतर संतांनी धर्मजागृती सभेमध्ये हिंदु जनांना मार्गदर्शन केल्यामुळेच सभेचा उद्देश सफल झाला आहे. त्यामुळे मलाच आपले शतशः आभार मानायला हवेत. सनातनचे कार्य आपल्यासारख्या संतमंडळींच्या कृपाशीर्वादानेच चालले आहे आणि त्यामुळेच धर्मजागृतीच्या कार्याला वेग येत आहे.
कोल्हापूरच्या सभेत कोणत्याही संघटनेचे किंवा पक्षाचे नेते मार्गदर्शन करायला नसूनही आणि व्यासपिठावर केवळ संतच असूनही सभेला ८ सहस्र धर्माभिमानी आले अन् सभा यशस्वी झाली. त्यामुळे ‘निःस्वार्थी आणि लोककल्याणाकरिता असलेली संतशक्तीच धर्मजागृती करू शकते’, हे सिद्ध झाले. धर्मजागृती सभेतील आपले विचार स्पष्ट, धर्मद्वेष्ट्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आणि धर्माभिमान जागृत करणारे होते.
‘आपल्यासारख्या संतांचे कृपाशीर्वाद यापुढेही जागृत हिंदूंना लाभोत आणि हे धर्मजागृतीचे कार्य लवकरात लवकर पूर्ण होवो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना करून पत्र पूर्ण करतो.
आपला,
डॉ. जयंत आठवले,
संस्थापक, सनातन संस्था (२०.१.२००८)