विशाळगड अतिक्रमणाच्या प्रकरणी आंदोलन करून तोडफोड करणार्‍या ५०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

कोल्हापूर – प्रशासन विशाळगडवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत असल्याने १४ जुलैला गडप्रेमींचा उद्रेक झाला. यात विशाळगडावरील अतिक्रमण करणार्‍यांची घरे, दुकाने यांच्यावर दगडफेक करण्यात आली. दुचाकी-चारचाकी फोडण्यात आल्या, जाळपोळ करण्यात आली, तसेच विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील प्रार्थनास्थळावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी काही पोलिसांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी ५०० हून अधिक जणांविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण पडताळून, तसेच अन्य काही माहितीच्या आधारे पोलीस अधिक कारवाई करत आहेत.

१५८ पैकी दोनच अतिक्रमणे न्यायप्रविष्ट असतांना प्रशासनाने अन्य अतिक्रमणे का काढली नाहीत ? – माजी खासदार छत्रपती संभाजीराजे

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे

या प्रकरणी १५ जुलैला सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘‘विशाळगडावरील १५८ पैकी दोनच अतिक्रमणे न्यायप्रविष्ट असतांना प्रशासनाने अन्य अतिक्रमणे का काढली नाहीत ? येथील एक स्थानिक नेता आणि पालकमंत्री मला पुरोगामीत्व शिकवतात. माझा त्यांना प्रश्‍न आहे की, प्रश्‍न न्यायप्रविष्ट आहे, हे तुम्हाला कुणी सांगितले ? शिवप्रेमींचा उद्रेक झाल्यावर प्रशासनाला जाग आली. यापूर्वी गेल्या दीड वर्षांत हे अतिक्रमण का काढले नाही ? काही गडप्रेमींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. प्रशासन स्वत:च्या चूक झाकण्यासाठी आणि स्वत:चे उत्तरदायित्व झटकण्यासाठी जाणीवपूर्वक गडप्रेमींना लक्ष्य करत आहे. मी सर्व गडप्रेमींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सवार्र्ंनी संयम बाळगावा आणि कायद्याचा मान राखावा.’’

झालेल्या हानीचे पोलीस आणि महसूल यांच्याकडून पंचनामे चालू ! – पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित

अतिक्रमणाचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याने आंदोलन करू नये, अशी विनंती करण्यात आली होती. या आंदोलनास अनुमती देण्यात आली नव्हती. आंदोलकांनी जी तोडफोड केली आहे, त्या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. झालेल्या हानीचे पोलीस आणि महसूल यांच्याकडून पंचनामे चालू आहेत.

‘त्या’ प्रकरणी स्थानिक नेत्यांची भूमिका काय आहे ?

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत झालेल्या बाँबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आतंकवादी यासिन भटकळ विशाळगडावर राहून गेल्याची नोंद आहे, मग यावर प्रशासन आणि तेथील स्थानिक नेत्यांची भूमिका काय आहे ?, असा प्रश्‍न माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला !

दगडफेक करणार्‍यांवर कारवाई करा ! – गणी आजरेकर, अध्यक्ष, ‘मुस्लिम बोर्डिंग’

विशाळगडावरील दर्गा आणि मशीद ही १ सहस्र वर्षांपूर्वीची आहे. कोल्हापूर ‘गॅझेट’मध्ये त्याची नोंद आहे. त्यामुळे ज्यांनी दर्ग्यावर दगडफेक केली, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. विशाळगडावरील सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे अतिक्रमण काढण्यास मुसलमान समाजाचा कोणताही विरोध नाही, असे पत्रक ‘मुस्लिम बोर्डिंग’चे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.