केडगाव (जिल्हा पुणे) येथील ख्रिस्ती संस्था बनली अनाचाराचा अड्डा !
दौंड (जिल्हा पुणे) – तालुक्यातील केडगाव येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ ही ख्रिस्ती संस्था अनुसूचित समाजातील मुलींचे सक्तीने धर्मांतर करत असल्याचे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनात नुकतेच गाजले. या वेळी या संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. अन्य एका प्रकरणात १२ जुलै या दिवशी या संस्थेचा वित्त व्यवस्थापक भास्कर निरुगुट्टी याच्यावर ३ अल्पवयीन मुली आणि १ युवती यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी यवत पोलिसांनी अटक केली आहे. लैंगिक अत्याचारांचे हे प्रकरण १७ एप्रिल २०२४ या दिवशी घडल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी येथील समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने यवत पोलिसांना तक्रार दिली आहे.
ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप !
या संस्थेत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप आहे. यापूर्वीही या संस्थेवर विविध आरोप झाले आहेत. या संस्थेत असलेल्या अनाथ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असून हे प्रमाण अधिक असून काही प्रकरणे दडपली जात आहेत, असा आरोप या संस्थेवर यापूर्वीही वारंवार झाला आहे. १५ वर्षांपूर्वीही असाच प्रकार या संस्थेत घडला होता. ‘असले प्रकार घडल्यानंतर उघडकीस येत नाहीत’, असेही अनेकांचे म्हणणे आहे. ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’मध्ये धर्मांतर होत नाही, असे स्पष्टीकरण ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’चे माजी अध्यक्ष मार्कस देशमुख यांनी दिले आहे.
आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी !
ही संस्था अनाथ, अंध, अपंग मुलींना शिक्षणासाठी निवास आणि विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून देते. त्या विद्यार्थिनींचे संगोपन, शिक्षण आणि नोकरी अशा सर्व गोष्टी संस्थेच्या वतीने अनेक वर्षांपासून केल्या जात आहेत. या संस्थेची खासगी आणि सरकारी शाळा याच परिसरात आहे. भास्कर निरुगुट्टी याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनेक सामाजिक संस्थांद्वारे करण्यात आली. या वेळी काही सामाजिक संस्था ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’च्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात उपस्थित होते; मात्र पोलिसांनी निरुगुट्टी याला अटक केली असून त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे, अशी माहिती मिळताच आंदोलकांनी माघार घेतली.
संपादकीय भूमिका
|