Nambi Narayanan : पोलीस अधिकार्‍यांनी कुभांड रचून इस्रोच्या शास्त्रज्ञांना अटक केल्याचे उघड !

  • नंबी नारायणन् यांच्यावरील खोट्या हेरगिरीच्या प्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र सादर

  • २ माजी पोलीस महासंचालकांना झाली आहे अटक !

वैज्ञानिक नंबी नारायणन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (‘इस्रो’चे) वैज्ञानिक नंबी नारायणन् यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली अनेक वर्षे कारागृहात घालवलेल्या नंबी नारायणन् यांना यापूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सीबीआयने केरळ न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या आरोपपत्रात वर्ष १९९४ मधील इस्रोमधील हेरगिरी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. केरळ पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका माजी अधिकार्‍याने हा कट रचल्याचे सीबीआयने म्हटले आहे. यात सीबीआयने केरळचे माजी पोलीस महासंचालक सी.बी मॅथ्यूज आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर्.बी. श्रीकुमार यांना अटक केली आहे. अन्य ३ निवृत्त पोलीस अधिकारी एस्. विजयन्, के.के. जोशुआ आणि पी.एस् जयप्रकाश यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सीबीआयने थिरूवनंतपूरम येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यात म्हटले आहे की, मालदीवच्या एका महिलेला अवैधपणे कह्यात घेण्याचे समर्थन करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. वर्ष २०२१ मध्ये नंबी नारायणन् यांच्यावर केरळ पोलीस आणि वरिष्ठ गुप्तचर अधिकारी यांच्या कथित भूमिकेची चौकशी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पाकिस्तानसाठी मध्यस्थ म्हणून काम करणार्‍या मालदीवच्या २ महिलांवर तंत्रज्ञानाची गुपिते विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

सीबीआयने आरोपपत्रात काय म्हटले आहे ?

सीबीआयने सांगितले की, हे प्रकरण आरंभीपासूनच कायदा आणि अधिकार यांच्या गैरवापराचे उदाहरण आहे. आरोपींनी मालदीवच्या २ महिला मरियम रशीदा आणि फौजिया हसन, इस्रोचे शास्त्रज्ञ डी. शशिकुमारन् आणि नंबी नारायणन्, तसेच चंद्रशेखर आणि एस्.के. शर्मा यांना हेरगिरीच्या प्रकरणात गोवले.

माजी पोलीस अधिकार्‍याला रशिदासमवेत ठेवायचे होते शारीरिक संबंध !

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार मालदीवची महिला मरियम रशीदा थिरुवनंतपूरम्मधील एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्या वेळी विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेला एस्. विजयन् त्याच हॉटेलमध्ये पोचला. तो मरियम रशिदा यांच्या खोलीत घुसला आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यास मरियम यांनी विरोध केला, तेव्हा विजयन्ने मरियम यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना अटक केली. नंतर विजयन्ने रशिदा यांचे नाव इस्रोचे शास्त्रज्ञ डी. शशिकुमारन् यांच्याशी जोडले आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण विणले गेले.

अशा प्रकारे नंबी नारायणन् यांना गोवण्यात आले !

आरोपपत्रात म्हटले आहे की, विजयन्ने पटकन खोली सोडली आणि मरियम रशिदा आणि फौजिया हसन यांची माहिती गोळा केली. हॉटेलच्या नोंदीवरून असे दिसून आले की, रशिदा इस्रोमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ डी. शशिकुमारन् यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कात होत्या. विजयन्ने त्यांचे पारपत्र आणि माले येथे जाण्याच्या विमानाचे तिकीटही जप्त केले. भारतातील व्हिसा संपल्यानंतरही रशिदा यांना भारतातून जाण्यापासून रोखले. खोटा चौकशी अहवाल सिद्ध करण्यात आला, ज्याच्या आधारे इतर लोकांना अटक करण्यात आली. चौकशीच्या वेळी त्यांच्याकडून कबुलीजबाब घेण्यासाठी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला.

नंबी नारायणन् यांचा ५० दिवस छळ करण्यात आला !

भारतातील अनेक रॉकेटमध्ये वापरण्यात येणारे विकास इंजिन विकसित करण्यात शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांचा मोलाचा वाटा होता. हेरगिरीच्या आरोपानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांचा शारीरिक अन् मानसिक छळ करण्यात आला. हा छळ ५० दिवस चालला. यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेची आणि व्यवसायाची मोठी हानी झाली. नारायणन् यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याचे सांगत न्याय देण्याची मागणी केली.

काय म्हणाले नंबी नारायणन् ?

सत्य समोर आणण्यासाठी २० वर्षे लढा देणारे नंबी नारायणन् आरोपपत्रावर म्हणाले की, एक व्यक्ती म्हणून मला दोषींना शिक्षा झाली कि नाही ?, याने काही फरक पडत नाही. त्यांनी चूक केली हे मान्य केले, तर ते पुरेसे होईल.

संपादकीय भूमिका 

इस्रोच्या शास्त्रज्ञांना खोट्या प्रकरणात अटक करून त्यांचा छळ करण्यासह देशाची अपरिमित हानी करणार्‍या अशा पोलीस अधिकार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !