१. छातीतील गाठीचे शस्त्रकर्म होणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘जखम भरायला एक ते दीड मास लागतील’, असे सांगणे
‘बर्याच वर्षांपासून माझ्या छातीत एक लहानशी गाठ होती. आधुनिक वैद्यांचे औषधोपचार आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करून ती गाठ बरी झाली होती. २ वर्षांनंतर ती गाठ परत आली. ती गाठ हळूहळू मोठी झाली. उपचारांसाठी आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला शस्त्रकर्म करावे लागेल.’’ गुरुपौर्णिमा झाल्यावर २ दिवसांनी शस्त्रकर्म करायचे ठरले. आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘गाठ आतमध्ये पुष्कळ मोठी झाली आहे.’’ त्यामुळे मला शस्त्रकर्म करायला शल्यचिकित्सा विभागात नेतांना पुष्कळ भीती वाटत होती. तेव्हा मी ‘शस्त्रकर्म गुरुमाऊलीच करणार आहेत’, असा भाव ठेवला. शस्त्रकर्म झाल्यावर आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘छातीच्या मध्यभागी असल्यामुळे जखमेला टाके घालता आले नाहीत. जखम १ इंच तरी खोल आहे. भरायला एक ते दीड मास जाईल.’’
२. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव भेटल्यावर त्यांच्या चैतन्यामुळे जखम लवकर भरून येणे
सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि सनातन संस्थेच्या ७४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव मला भेटायला आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा मला ‘त्यांनी त्यांचा हात माझ्या हृदयावर ठेवावा’, असे वाटले. खरेच त्यांनी माझ्या हृदयावर हात ठेवला. तेव्हा ‘माझ्या शरिरात पुष्कळ चैतन्य जात आहे आणि माझ्यावर चैतन्याचा वर्षाव होत आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. त्यानंतर २ दिवसांनी मी जखमेवर मलमपट्टी करून घ्यायला (‘ड्रेसिंग’साठी) गेल्यावर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमची जखम एवढी लवकर कशी काय भरली ?’’ आधुनिक वैद्यांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. संतांच्या चैतन्यमय स्पर्शाने अशक्य ते शक्य झाले.
‘हे भगवंता, हे सर्व तुझ्या आणि गुरुमाऊलींच्या कृपेनेच अनुभवता आले. त्यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. अपर्णा केणी, सानपाडा, नवी मुंबई. (४.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |