भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व, सिंध प्रांतातील महाभयंकर आक्रमण आणि महापराक्रमी पृथ्वीराज चौहान राजाचे शौर्य अन् शिरच्छेद, कुठे कट्टरपंथी मुसलमान आणि कुठे तथाकथित प्रगत समाजवादी अन् निधर्मीवादामुळे हिंदु धर्माचा घात’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(लेखांक १७)

मागील भाग येथे  वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/810558.html

प्रकरण ४

२०. बंधनातील स्त्रियांना मुक्त करून मिळवून दिलेली प्रतिष्ठा आणि हिंदूंचे केले गेलेले शुद्धीकरण

श्रीकृष्णाने भौमासुराच्या बंदीखान्यातून १६ सहस्र स्त्रियांना मुक्त करून त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. हा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून मारवाडच्या रायमल राजाने ६०० मुसलमान स्त्रियांना सामूहिकरित्या शुद्ध करून घेऊन आपल्या निरनिराळ्या सरदारांशी त्यांचे विवाह लावून दिले. मेवाडचा राणा कुंभ यानेही अशाच प्रकारे अनेक मुसलमान स्त्रियांना शुद्ध करून घेऊन त्यांचे आपल्या सरदारांसमवेत विवाह लावून दिले.

सिंध आणि त्या पलीकडचा प्रदेश पुन्हा स्वराज्यात सामील करून घेणारा शूर राणा बाप्पा रावळ याने एका मुसलमान राजकुमारीशी लग्न केले. तिला आपल्या अन्य राण्यांसह ठेवून घेतले. तिची संतती राजपूत समाजात ‘सूर्यवंशी’ म्हणून ओळखली गेली. नेपाळच्या जयस्थिती राजाने तर मुसलमान आक्रमण अत्यंत त्वेषाने परतवले. मंदिरे पुनरुज्जीवित केली आणि बाटलेल्या हिंदु बौद्धांना शुद्ध करून घेतले. काही मुसलमान लेखकांच्या ‘तवारिख’ ग्रंथांत ‘हिंदु लोक मुसलमान स्त्रियांना हिंदु करून घेतात आणि त्यांच्याशी लग्ने लावतात’, असे लिहिले आहे.

काही राजपूत राजांनी आपल्या राज्यात यज्ञ करून मोठमोठी सरोवरे बांधली. या सरोवरात स्नान करण्याने बाटलेले लोक शुद्ध होऊन पुन्हा हिंदू होतील, अशी व्यवस्थाही त्यांनी केली होती. शृंगेरीपीठाचे चौदाव्या शतकातील शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांनी हरिहर आणि बुक्क या बळजोरीने बाटवलेल्या वीरबंधूंची जाहीरपणे शुद्धी केली अन् सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. त्या वीरबंधूंनी मुसलमानी सत्तांचे पराभवामागून पराभव केले. वर्ष १३३६ मध्ये स्वतंत्र हिंदु राज्य स्थापन करण्यात आले आणि हरिहराला ‘हिंदु सम्राट’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याचा राज्याभिषेक स्वतः शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर यांची शुद्धी करून त्यांना आपल्या हिंदु धर्मात पुन्हा प्रवेश दिला. छत्रपती संभाजी महाराजांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत असे शुद्धीकरण केले.

२१. गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका !

गोव्यात ४०० वर्षे ख्रिस्ती कॅथॉलिकांचे अधिराज्य होते. त्या काळातील तेथील हिंदूंचा केलेला धार्मिक छळ प्रसिद्ध आहे. सेंट झेवियर याने वर्ष १५४० मध्ये गोव्यात आल्यावर बाटवाबाटवीला जोमात आरंभ केला; पण त्याला अपेक्षित यश येईना. त्याने पोर्तुगालच्या बादशाहला लिहिलेल्या एका पत्राचा भावार्थ असा, ‘हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्मप्रचारास आम्हाला जो अडथळा येतो, तो येथील ब्राह्मण लोकांचा होय. ते आमच्या धर्मप्रचारास पुढे जाऊ देत नाहीत. सहस्रावधी सामान्य हिंदु लोक आम्ही बाटवत जातो; पण मागे वळून पहातो, तो हे ब्राह्मण त्यांना मांडवी नदीत स्नान घालून काही श्लोक म्हणून पुन्हा हिंदु करतात. जर हे ब्राह्मण लोक आमच्या मार्गात आड आले नसते, तर मी पहाता पहाता हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करू शकलो असतो.’

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

या पुढील लेख वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/811098.html