पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व, सिंध प्रांतातील महाभयंकर आक्रमण आणि महापराक्रमी पृथ्वीराज चौहान राजाचे शौर्य आणि शिरच्छेद, कुठे कट्टरपंथी मुसलमान अन् कुठे तथाकथित प्रगत समाजवादी आणि निधर्मीवादामुळे हिंदु धर्माचा घात, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक १८)
मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/810825.html
१. हिंदुस्थान आणि राजसत्ता !
काही विद्वान म्हणतात, ‘‘संपूर्ण हिंदुस्थान कधीही एका राजसत्तेखाली नव्हता. येथे अनेक राज्ये आणि अनेक राजे होते. तेसुद्धा अनेक वेळा एकमेकांवर चढाया करत, एकमेकांचे मुलुख जिंकून घेत. हा संपूर्ण देश एका सत्तेच्या हाती केवळ इंग्रजांच्या कारकीर्दीत आला आणि भारत स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तानविरहित संपूर्ण भारत एका छत्राखाली आला.’’ हे काही अंशाने खरे असले, तरी या खंडप्राय देशातील ५६ देशांचे राजे हे हिंदु होते. ते हिंदु धर्म मानत होते. त्यांची राजनीती हिंदु होती. त्यांच्या सर्व परंपरा हिंदुत्वाधिष्ठित होत्या. ते राजे केवळ हिंदु कायदे न करता ते कृतीत आणत असत. न्याययंत्रणा समान कायद्यांनी चालत होती. राजे व्यक्तीगत स्वरूपात भिन्न असले आणि त्यांची राज्ये भिन्न असली, तरी ती एकाच ‘राज्यघटने’नुसार कारभार करत. या अर्थाने हिंदु राष्ट्र एक होते.
२. जिनांचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत गांधींना अमान्य !
सध्या जगात अनेक मुसलमान देश आहेत, जे इस्लामी कायद्यांनुसार चालतात. देश अनेक; पण त्यांचे कायदे ज्या मूलतत्त्वांवर आधारित आहेत, ती एकच ! जिनांनी जो द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, तो आपण कितीही नाकारला, तरी खरा होता. ‘हिंदुस्थानात हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे आहेत. ती एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत’, असे जिनांचे मत होते; पण ते गांधीजींना मान्य नव्हते.
३. गांधींचा मुसलमानांवर आंधळा विश्वास !
गांधी एका लेखात म्हणतात, ‘मला असे वाटत नाही की, प्रत्यक्ष निर्णय घेण्याचा प्रसंग येईल, तेव्हा ‘मुसलमान खरोखरच देशाची फाळणी व्हावी’, अशी अपेक्षा करतील. त्यांची सद्बुद्धी त्यांना तसे करण्यापासून थांबवील. फाळणीमुळे उत्पन्न होणारा स्वाभाविक आत्मघात त्यांचा धर्म त्यांना करू देणार नाही. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा अगदी खोटा आहे. भारतीय मुसलमानांत प्रचंड बहुसंख्येने धर्मांतरित हिंदू आहेत किंवा त्यांचे वंशज आहेत. त्यांनी धर्मांतर केल्यावर काही ते दुसरे स्वतंत्र राष्ट्र बनले नाही. बंगाली मुसलमान किंवा बंगाली हिंदूंचीच भाषा बोलतात, तसेच अन्न खातात आणि आपले मनोरंजनही त्यांच्याच पद्धतीने करतात. त्यांची वेशभूषाही समानच असते. या बाह्यलक्षणांनी बंगाली हिंदू आणि बंगाली मुसलमान एकमेकांपासून वेगळे कसे, हे समजण्यास मला नेहमीच जड जाते. भारताच्या जनतेत मोठ्या प्रमाणात असणार्या गरिबांच्या संदर्भात दक्षिणेकडेही अल्प-अधिक प्रमाणात मला हीच गोष्ट आढळून आली. अली इमाम यांची माझी जेव्हा पहिली भेट झाली, तेव्हा मला ते हिंदु नसल्याचे ठाऊक नव्हते. त्यांचे बोलणे, वागणे, खाणे-पिणे आणि वेशभूषा सारे काही हिंदूप्रमाणे होते. त्यांच्या केवळ नावाने मला दगा दिला. कायदे आझम जिनांच्या संदर्भात तसेही नाही; कारण त्यांचे नाव कुणा हिंदूचेही असू शकते. ते मला प्रथम भेटले, तेव्हा ते मुसलमान आहेत, हे मला ठाऊक नव्हते. त्यांचे संपूर्ण नाव कळले, तेव्हाच मला ते मुसलमान असल्याचे लक्षात आले. त्यांचे राष्ट्रीयत्व त्यांच्या चेहर्यावर आणि वागणुकीतून व्यक्त होत होते.’
– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
पुढील लेख वाचण्या करिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/811458.html