भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, तिच्याशी निगडित घटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेतून ‘हिंदु’ कोण ? सुसंस्कृत समाजातील श्रेष्ठ गुण, चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व, सिंध प्रांतातील महाभयंकर आक्रमण आणि महापराक्रमी पृथ्वीराज चौहान राजाचे शौर्य आणि शिरच्छेद, कुठे कट्टरपंथी मुसलमान अन् कुठे तथाकथित प्रगत समाजवादी’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.   (लेखांक १६)

या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता  https://sanatanprabhat.org/marathi/810213.html

प्रकरण ४

१७. निधर्मीवादामुळे हिंदु धर्माचा घात !

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

देशाची फाळणी होऊनही पाकिस्तानविरहित उर्वरित भारताला या राजकारण्यांनी सेक्युलर (निधर्मी) ठरवले. मुसलमानांसाठी पाकिस्तान तोडून दिल्यावर उरलेला भाग हा खरे तर हिंदुस्थानच असायला हवा होता; पण उदारबुद्धीच्या हिंदूंना ‘सेक्युलॅरिझम’चा उदारपणा हिंदु धर्माचा घात व्हायला कारणीभूत होईल, हे लक्षात आले नाही. हिंदु धर्म हा परधर्मियांचा द्वेष करणारा नाही. हिंदुत्व हेच तसे सेक्युलर आहे; पण लक्षात कोण घेतो ?

१८. वर्षानुवर्षे धार्मिक आक्रमणे होऊनही हिंदु धर्म टिकणे 

१ सहस्र ते १ सहस्र २०० वर्षे धार्मिक आक्रमणे होऊनही हिंदु धर्म टिकला कसा ? कारण इतर अनेक देशांवर झालेल्या आक्रमणांतून तेथील मूळ धर्म नामशेष झाला असून तेथील आजच्या रहिवाशांना आपण मूळ कोण होतो, हे ठाऊकही नाही. मूरांच्या आक्रमणाने स्पेन मुसलमान झाला होता, तो ख्रिस्ती आक्रमणानंतर ख्रिस्ती झाला. आपण मूळ कोण होतो, हे स्पॅनिश लोकांना ठाऊकही नाही. असे अनेक देशांचे झाले; पण आपले असे का झाले नाही ? याचे उत्तर महत्त्वाचे आहे.

१९. क्रूरकर्मा टिपू सुलतानने केलेले अनन्वित अत्याचार आणि टिपू मारला जाणे 

राजकीय आघाडीवर मुसलमान राज्यकर्त्यांना सतत हिंदूंच्या स्वातंत्र्ययुद्धांना तोंड द्यावे लागले. त्यांना सुखा-समाधानाने राज्य करता आले नाही. पृथ्वीराज चौहान, बाप्पा रावळ, राणा प्रताप, राणासंग इत्यादी राजपूत राजांसह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे यांसारखे मराठी शूर स्वातंत्र्यवीर या आणि अशा शेकडो शूरविरांनी आक्रमक मुसलमानांच्या आक्रमकांना वेळोवेळी जिद्दीने तोंड दिले.

क्रूरकर्मा टिपूने कर्नाटकात धुडगूस घातला. सहस्रावधी हिंदूंना रक्तस्नान घातले. सहस्रो स्त्रियांवर विहिरीत उड्या टाकण्याचे प्रसंग आले. नरगुंद आणि कित्तूर या संस्थानांमध्ये टिपूने अक्षरशः नंगानाच घातला. सहस्रो स्त्रियांवर अत्याचार करवले. जाळपोळ आणि विध्वंस अमर्याद प्रमाणात केला.

याचा प्रतिशोध घेण्यासाठी मराठ्यांच्या बलदंड सेनांनी सरदार पटवर्धन, फडके, बेहरे, होळकर, भोसले यांच्या नेतृत्वाखाली टिपूच्या सैन्याला झोडपत संपूर्ण कर्नाटक मुक्त केला. मुसलमानी सैन्याचा प्रचंड संहार केला. त्याच वेळी इंग्रजांनीसुद्धा टिपूवर आक्रमण केले. भयग्रस्त झालेल्या हिंदुद्वेष्ट्या टिपूने नंतर हिंदु देवीदेवतांची भक्ती करायला आरंभ केला. देवस्थानांना देणग्या दिल्या. अनुष्ठाने केली. शंकराचार्यांचा सत्कार केला. तरीही शेवटी टिपूचे सारे राज्य मराठे आणि इंग्रज यांनी जिंकून घेतले अन् टिपू मारला गेला.

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)