भाव असल्याविना परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो, त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाविना चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याविना होत नाही. जसा तुमचा भाव असेल, त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले.
खरा परमार्थ
गुरु सांगतील, तेच साधन होय. परमार्थ म्हणजे काय ? परमार्थाचे जर काही मर्म असेल, तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ‘ज्याने आपल्याला प्रपंच दिला, त्याचाच तो आहे’, असे समजून वागले, म्हणजे आपल्याला त्याविषयी सुख-दुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कुणाला करावे ? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वत:करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका अल्प दिसेल, तितका आपल्याला लाभदायी आहे. त्यासाठी साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)