‘नदी की पाठशाला’ निमित्ताने…

चिपळूण – ‘सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र शासन’ आणि ‘चला जाणू या नदी’ला अंतर्गत चिपळूण नगर परिषद आयोजित डीबीजे महाविद्यालयाच्या ‘सेमिनार हॉल’मध्ये पार पडलेल्या ३ दिवसांच्या (२१ ते २३ जून २०२४) ‘नदी की पाठशाला’ कार्यक्रमाचा अनुभव अविस्मरणीय राहिला. या ३ दिवसांत संशोधक-अभ्यासकांचे मार्गदर्शन, वाशिष्टी नदी क्षेत्रभेट आणि कोकणातील नदी-जल यशकथा यांचे उत्तम मिश्रण अनुभवले. वर्ष २०१५-१६ मध्ये वाशिष्टी नदीच्या कुंभार्ली घाटातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील उगमाचा शोध घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, मान्यवरांच्या समोर वाशिष्टी नदी विषयक मनोगत व्यक्त करता आले.

‘नदी की पाठशाला’ आयोजित करणारी चिपळूण ही भारतातील पहिली नगर परिषद

या निमित्ताने भारताचे जलपुरुष आदरणीय डॉ. राजेंद्रसिंह यांचे मार्गदर्शन आणि लाभलेले सान्निध्य अमूल्य होते. त्यांच्यासह भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, जीवित नदी पुणेच्या संस्थापक शैलजा देशपांडे, डॉ. अजित गोखले, यशदाचे निवृत्त संचालक डॉ. सुमंत पांडे, जलबिरादरी महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. नरेंद्र चौघ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळोखे, उदयजी गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे मार्गदर्शन लाभले. ‘नदी की पाठशाला’ आयोजित केल्याबद्दल चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे ‘नदी की पाठशाला’ नगर परिषद स्तरावर आयोजित करणारी चिपळूण ही भारतातील पहिली नगर परिषद ठरली.शहरांना महापूरमुक्त करण्यासाठी वृक्षतोडबंदीसह नदी पात्रांवरही काम करणे आवश्यक !

नदी विषयाच्या आमच्या श्रद्धा गढूळ झाल्या तेव्हापासून नदीचे पात्र गढूळ होत गेले आहे. नदीच्या क्षेत्रात आमची पावले वळायला हवीत. नदीच्या परिक्रमा व्हायला हव्यात. एकूणच नदी कृतज्ञतेचे उत्सव व्हायलाच हवेत, हे आम्ही यापूर्वी वाशिष्टी नदी परिक्रमा आणि वाशिष्टीला साडी नेसवण्याच्या उपक्रम निमित्ताने मांडलेले विचार इथे संशोधन स्वरूपात अभ्यासता आले. शहरांना महापूरमुक्त करायचे असल्यास समूळ वृक्षतोडबंदीसह जगबुडी (खेड) नदी पात्रावरही काम करावे लागेल, अशा अनेक कळीच्या सूत्रांचे गांभीर्य या ३ दिवसांत लक्षात आले.

लेखक – श्री. धीरज वाटेकर