Palestine PM : गाझातील नरसंहार थांबवण्यासाठी भारताने साहाय्य करावे ! – पॅलेस्टाईनचे पंतप्रधान

पॅलेस्टाईनचे पंतप्रधान महंमद मुस्तफा यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून केले आवाहन

भारताचे पंतप्रधान मोदी व पॅलेस्टाईनचे पंतप्रधान महंमद मुस्तफा

तेल अविव (इस्रायल) – भारत एक जागतिक नेता म्हणून गाझामध्ये चालू असलेला नरसंहार संपवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीसाठी भारताने सर्व राजनैतिक माध्यमांचा वापर करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पॅलेस्टाईनने केले आहे. पॅलेस्टाईनचे पंतप्रधान, तसेच परराष्ट्रमंत्री असलेले महंमद मुस्तफा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वरील आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या तिसर्‍या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदनही केले आहे.

पॅलेस्टिनी पंतप्रधान मुस्तफा यांनी पुढे म्हटले आहे की, गाझाला मानवतावादी साहाय्य पुरवण्यासमवेतच, भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासह पॅलेस्टिनींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. भारताने सातत्याने त्याची वचनबद्धता दाखवली आहे. पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांसाठी योगदान दिले आहे. ‘कोणत्याही संघर्षात आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केलेच पाहिजे’, असे भारताने नेहमीच म्हटले आहे. भारत नेहमीच मानवी हक्क आणि शांततेचा समर्थक राहिला आहे.

संपादकीय भूमिका

  • पॅलेस्टाईनने कधी ‘हमासने आतंकवादी कारवाया करू नयेत’, ‘हमासने ओलिसांची सुटका करावी’, असे आवाहन हमासच्या आतंकवाद्यांना केले आहे का ?
  • काश्मीरच्या प्रश्‍नावर पॅलेस्टाईनने कधी भारताची बाजू घेतली आहे का ? इस्लामी देश पाकला हिंदूंच्या नरसंहारावरून कधी सुनावले आहे का ?