पितृदेवो भव…!

११ जून २०२४ या दिवशी आमचे तीर्थरूप भारताचार्य धर्मभूषण प्रा. सु.ग. शेवडे (आबा) हे संतपदी विराजमान झाल्याचे वृत्त १२ जूनच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचले आणि आनंद झाला. आम्ही प्रवचनकार-व्याख्याता-साहित्यिक म्हणून जे काही यश मिळवले त्याला ते कारण आहेत ही नम्र भावना आहे !

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

१. भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांना भारतात आणि त्यातही हिंदु धर्मात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान !

जवळपास अर्ध्याहून अधिक जग फिरून हिंदु धर्माचा ध्वज फडकता ठेवण्याचे महत्कार्य त्यांच्या (भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्या) हातून घडले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एकट्या अमेरिकेतच त्यांचे ७ दौरे आणि जवळपास ५५० हून अधिक कार्यक्रम झाले. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांनी जनजागरणासाठी भरपूर भटकंती केली. हिंदुत्वनिष्ठ असल्याने माध्यमांनी त्यांच्याकडे बर्‍यापैकी दुर्लक्ष केले. अन्य कोणत्या देशात आणि धर्मात ते जन्माला आले असते, तर तेथील माध्यमांनी त्यांना नक्कीच डोक्यावर घेतले असते. अर्थात् त्याचा त्यांना खेद नाही. उलटपक्षी भारतात आणि त्यातही हिंदु धर्मात जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे. ही सल खरे तर आमच्याच मनातील आहे. संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमधून ते सहजपणे संवाद साधतात !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

२. भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्या प्रवचनांचे आगळेवेगळे विक्रम !

आज लक्षावधी घरांमधून अत्यंत श्रद्धेने म्हटली जाणारी ‘गजानन बावनी’ ही शेगाव येथील गजानन महाराजांवरील त्यांची (पू. आबांची) रचना अफलातून आहे. गेली ६० वर्षे श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे सलग प्रवचने करण्याचा वेगळाच विक्रम केल्याबद्दल ८ वर्षांपूर्वी तेथील श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांना मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. शेगाव संस्थानातही गेली ३८ वर्षे त्यांची सलग प्रवचने प्रतिवर्षी आश्विन मासात होत असतात.

३. ‘सत्यसंकल्पाचा दाता ईश्वर’ याची प्रचीती घेणारे भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे !

ते ६० वर्षांचे असतांना त्यांना ‘शंभूराजे’ या विषयाने पछाडले. सतत संशोधन करून त्यांनी ‘शंभूराजे’ हे छोटेखानी चरित्र लिहिले. ‘त्याच्या १ लक्ष प्रती घराघरांत जाव्यात’, असा संकल्प सोडला आणि चरित्रावर १ सहस्र व्याख्याने देण्याचे ठरवले. त्या १ लक्ष प्रती कधीच संपल्या आणि १ सहस्रांहून कैक अधिक व्याख्याने झाली. ‘सत्यसंकल्पाचा दाता ईश्वर’, असे म्हणतात ते खरे आहे !

४. शेवडे कुटुंबियांचे हिंदु धर्मासाठी चालू असलेले कार्य सद्गुरु श्री नानामहाराज तराणेकर यांच्या आशीर्वादाने चालू असणे

आमचे चिरंजीव वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह शेवडे घराण्यातील ३ पिढ्या आज व्याख्यान-लेखन क्षेत्रात आहेत, ही गोष्ट आम्हाला नक्कीच सुखावणारी आहे; पण याचे प्रणेते आमचे पू. आबा आहेत. त्यांचे सद्गुरु श्री नानामहाराज तराणेकर यांच्या आशीर्वादाने हे चालू आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे.

वयाच्या ८९ व्या वर्षांतही जो खळाळता उत्साह आणि सकारात्मक वृत्ती त्यांच्यात आहे तिला प्रणाम ! आजही ते कार्यक्रमात बोलायला उभे राहिले की, जेमतेम ६०-६५ वर्षांचे वाटतात. त्यामुळेच अजूनही त्यांच्या कार्यक्रमाचा धडाका चालू असतो. तो तसाच रहावा, ही प्रणामपूर्वक शुभेच्छा !!

– डॉ. सच्चिदानंद शेवडे (भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचे चिरंजीव), हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१२.६.२०२४)