मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ न होण्यासाठी काय करावे ? आणि काय करू नये ?

‘कायद्याच्या भाषेत मृत्यूपत्राला ‘इच्छापत्र’ (विल) अथवा ‘बिक्वेस्ट’ (Beguest) असे म्हणतात. ‘हिंदु उत्तराधिकार कायद्या’प्रमाणे (Hindu Succession Act) कोणत्या मृत्यूपत्राला कायदेशीर आणि बेकायदेशीर म्हणतात, याचे स्पष्टपणे विश्लेषण करण्यात आलेले आहे. ‘नैसर्गिकरित्या जी व्यक्ती सज्ञान आहे, म्हणजे जी २१ वर्षांहून अधिक वयाची आहे, तसेच ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन व्यवस्थित आहे’, अशीच व्यक्ती स्वतःच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र बनवू शकते.

१. निषिद्ध मृत्यूपत्र म्हणजे काय ?

ज्या मालमत्तेचे ‘इच्छापत्र’ करायचे आहे, ती मालमत्ता पूर्णपणे मालकी रूपाने त्या व्यक्तीच्याच नावावर असणे आवश्यक आहे, म्हणजे ज्या मालमत्तेवर अजून दुसर्‍या कुणाची तरी मालकी आहे, अशी मालमत्ता मृत्यूपत्रात नमूद करता येत नाही; परंतु जी मालमत्ता वरील सर्व नियमांच्या अखत्यारीत आहे, ती मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येते. अशा मृत्यूपत्राला कायदेशीर प्रभाव देता येतो, म्हणजेच न्यायालयाकडून अशा मृत्यूपत्रासाठी कायदेशीर वाटणीचे आदेश देता येतात. ज्या प्रकारचे मृत्यूपत्र अशा प्रकारात बसत नाही, त्यांना निषिद्ध वा रद्दबातल (रहित) मृत्यूपत्र (Void will) असे म्हणतात. ‘व्हॉईड’ याचा अर्थ निषिद्ध असा होतो.

२. कोणत्या प्रकारामध्ये मृत्यूपत्र निषिद्ध होते ?

‘हिंदु उत्तराधिकार कायद्या’प्रमाणे विविध निषिद्ध मृत्यूपत्रांना कायद्याने मान्यता नाही. उदाहरणार्थ

अ. एखाद्या व्यक्तीने जर स्वतःच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र बनवले आणि ज्या व्यक्तीने त्या निषिद्ध मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरीही केलेली असेल, तर त्या व्यक्तीच्याच नावावर मृत्यूपत्र बनवणार्‍याने संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर नावावर करण्याचे प्रावधान (तरतूद) केले असल्यास कायद्याने ते मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ या सदरात मोडते. अशा प्रकारच्या मृत्यूपत्राला कायद्याने मान्यता नाही.

आ. यासह कायद्याप्रमाणे ज्या व्यक्तीने साक्षीदार म्हणून एखाद्याचे मृत्यूपत्र साक्षांकित (ॲटेस्ट) केलेले असेल, तर त्याच्या बायकोच्या किंवा नवर्‍याच्या नावावर केलेले मृत्यूपत्रही ‘निषिद्ध’ या सदरात मोडते, म्हणजे मृत्यूपत्र साक्षांकित करणारी व्यक्ती आणि तिचे नातेवाईक जर अशा मृत्यूपत्रामध्ये समाविष्ट असतील, तर कायद्याने असे मृत्यूपत्रही ‘निषिद्ध’ ठरते.

इ. कायद्यामध्ये ‘संपत्तीचे हस्तांतरण’ या सदरात एक सिद्धांत पाळला जातो, तो म्हणजे The transfer always be a inter-vivos. Inter vivos याचा अर्थ दोन किंवा त्याहून अधिक जिवंत माणसांमध्ये व्यवहार केला जातो. त्यामुळे एखाद्या मृत्यूपत्रात न जन्मलेली व्यक्तीचा उल्लेख केलेला असेल आणि असे लिहिले असेल, ‘अमुक’ याच्या मृत्यूनंतर त्याच्या धाकट्या मुलाच्या धाकट्या मुलाला (ज्याचा जन्मच मृत्यूपत्र बनवतांना झालेला नाही) अशा व्यक्तीला संपत्ती देण्यात यावी’, असा उल्लेख असेल, तर असे मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ सदरात मोडते. समजा मृत्यूपत्र करणार्‍याच्या मृत्यूच्या वेळेस धाकट्या मुलाला जर कुणी मूलबाळच झालेले नसेल किंवा मुलाच्या ऐवजी मुलगी झाली असेल, तर मृत्यूपत्राप्रमाणे अशा संपत्तीची वाटणी होत नाही. अशी मृत्यूपत्रे निषिद्ध ठरतात.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

३. मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ न होण्यासाठी ते कसे असावे ?

‘हिंदु उत्तराधिकार कायद्या’च्या कलम ६७ प्रमाणे असे मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ ठरते. मृत्यूपत्र ज्या व्यक्तीच्या नावाने केले आहे किंवा जी व्यक्ती मृत्यूपत्र करत आहे, त्याने कोणत्याही प्रकारची अनिश्चितता जर त्यात नमूद केलेली असेल, तर अशा प्रकारचे मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ या प्रकारात मोडते. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्रात असे लिहिले असेल, ‘माझ्या मृत्यूनंतर माझे पैसे, धान्य, तेल किंवा तत्सम गोष्टी या एका निर्धारीत माणसाच्या नावाने करा.’ असे करून जर मृत्यूपत्र करणार्‍याचा नंतर मृत्यू झाला, तर त्याप्रमाणे वाटणीच्या वेळेस न्यायालयाला नेमके हेच कळाले नाही की, किती आणि कुठले पैसे, किती अन् कोणते धान्य, किती आणि कोणते तेल वाटप करायचे आहे ? अशा परिस्थितीत अशा मृत्यूपत्राच्या वाटचालीत अडचणी येतात. अनिश्चितता या मुद्यावर असे मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ ठरते.

कायद्याप्रमाणे असे मृत्यूपत्र कलम ८९ प्रमाणे ‘निषिद्ध’ ठरते. जर त्या मृत्यूपत्रात ‘माझ्या बँक ऑफ इंडियामधील अमुक एका खाते क्रमांकामधील जेवढे पैसे माझ्या मृत्यूच्या वेळेस असतील, तर ते पैसे ‘अमुक’ नावाच्या माणसाला देण्यात यावे, तसेच माझ्या घरातील  स्वयंपाकघरात ठेवलेले ५ किलो साखरेचे पोते माझ्या मृत्यूनंतर ‘अमुक’ नावाच्या माणसाला मिळावे’, असे विशिष्ट लिहिले गेले असते, तर त्या वेळेस कोणतीही अनिश्चितता रहात नाही आणि त्या वेळेस असे मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ होत नाही. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कायदेशीर विल्हेवाट, वाटणी करता येते. ‘Non existence of Person at the time of Testators death’ (ज्याने मृत्यूपत्र केले आहे त्याच्या मृत्यूच्या वेळी ज्याला वाटणी द्यायची आहे, त्या व्यक्तीचे अस्तित्व नाही) याप्रमाणे कायद्यातील कलम ११२ प्रमाणे एखादी व्यक्ती मृत्यूनंतर अस्तित्वातच नसेल आणि त्याचे नाव मृत्यूपत्रात लिहिण्यात आलेले होते, अशा वेळेस असे मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ या सदरात मोडते. उदाहरणार्थ ‘एखाद्या ‘अमुक’ व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर ‘अमुक’ नावाच्या व्यक्तीला त्याची संपत्ती द्यावी’, असे नमूद केले असेल आणि मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीचे जर निधन झाले अन् असेही झाले की, ज्या व्यक्तीचे नाव मृत्यूपत्रात लिहिलेले आहे, अशा व्यक्तीचेही या आधीच निधन झालेले आढळल्यास थोडक्यात ती व्यक्ती अस्तित्वात नसल्यास असे मृत्यूपत्र ‘निषिद्ध’ या सदरात येते.

कायद्याप्रमाणे वरील सर्व नमूद केलेले प्रकार ‘निषिद्ध’ मृत्यूपत्र या सदरात मोडतात.’

– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.