British Hindus Manifesto : हिंदूंच्या धार्मिक स्थळांना संरक्षण आणि शाळांमध्ये धर्मशिक्षण द्या !

  • ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणूक

  • ब्रिटनमध्ये हिंदूंनी प्रसारित केले मागणीपत्र !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये येत्या ३ जुलै या दिवशी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या संदर्भात येथील हिंदु संघटनांनी त्यांच्या मागण्यांचे एक मागणीपत्र प्रकाशित केले आहे. ‘द हिंदु मॅनिफेस्टो यूके २०२४’ असे याचे नाव असून यात ७ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. अनेक हिंदु संघटनांनी मिळून हे मागणीपत्र बनवले आहे. यात हिंदूंच्या धार्मिक स्थळांना संरक्षण देण्यासह शाळांमधून हिंदु धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हिंदूंच्या अन्य ५ मागण्या

१. हिंदुविरोधी गुन्हे आणि आक्रमणे यांना द्वेषपूर्ण गुन्ह्यांचा (‘हेट क्राईम’चा) दर्जा द्यावा.

२. हिंदूंना समान प्रतिनिधित्व आणि संधी द्यावी.

३. स्थलांतर, आरोग्य देखभाल आणि सामाजिक देखभाल व्यवस्थित करावी.

४. धार्मिक मूल्यांना मान्यता द्यावी.

५. धार्मिक मूल्यांना संरक्षण द्यावे.

या मागण्यांना अनेक उमेदवारांकडून पाठिंबा देण्याचे आश्‍वासन मिळाले आहे. हिंदु संघटनांनी निवेदनात म्हटले की, यामुळे ब्रिटनच्या हिंदु समुदायाच्या एकजुटीचा आवाज समोर येत आहे.

ब्रिटनमध्ये हिंदु चौथा सर्वांत मोठा धर्म !

वर्ष २०२१ च्या ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येपैकी ४६.२ टक्के ख्रिस्ती, ६.५ टक्के मुसलमान, १.७ टक्के हिंदु आणि ०.९ टक्के शीख आहेत. ३७ टक्के लोक कोणत्याही धर्माशी जोडलेले नाहीत. हिंदूंची एकूण लोकसंख्या २० लाखांहून अधिक आहे.

गेल्या काही काळात हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमणे !  

या मागणीपत्रामध्ये म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे वाढली आहेत. त्यांचे संरक्षण आवश्यक आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये लिस्टर शहरामध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदु मंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. मंदिरावरील ध्वजही जाळला. यावर्षी बर्मिंगहॅमच्या स्मेथविकमध्ये मंदिरावर आक्रमण करण्यात आले, तसेच स्विंडोनमध्येही तोडफोडीचे प्रकरण समोर आले. जानेवारी २०२४ मध्ये वेंबले येथे मंदिरात तोडफोड करून मूर्तीची हानी करण्यात आली.

मुसलमानांच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी ९७७ कोट रुपयांचे प्रावधान !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित असतांना ब्रिटनमध्ये येत्या ४ वर्षांत मुसलमानांच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी ९७७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. (ब्रिटनमध्ये हिंदु पंतप्रधान असल्याचा हिंदूंना काहीच लाभ नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! हिंदु कितीही मोठ्या पदावर पोचला, तरी तो हिंदु बांधव आणि हिंदु धर्म यांच्या संदर्भात नेहमीच धर्मघातकी धर्मनिरपेक्ष बनतो, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक)

ब्रिटीश शाळांमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची मागणी यापूर्वी फेटाळली होती !

ब्रिटनमध्ये ‘कमिशन ऑन रिलिजियस एज्युकेशन’ने वर्ष २०१३ मध्ये शाळांत हिंदूंना धार्मिक शिक्षण देण्यासाठी शिक्षक आणि साधने नसल्याचे कारण देत मागणी फेटाळली होती. ब्रिटनमधील ९३ टक्के हिंदूंच्या म्हणण्यानुसार ब्रिटीश शाळांमध्ये त्यांच्या मुलांना धर्माचे पुरेसे शिक्षण मिळत नाही.

ब्रिटनमध्ये भारतीय भाषा संस्कृत, हिंदी, तमिळ, गुजराती, पंजाबी, बंगाली, कन्नड, तेलुगु आणि मराठी यांच्या शिक्षण संस्थांची कमतरता असल्याचे सूत्र उपस्थित केले आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतातील हिंदु संघटना कधी निवडणुकीत असे मागणीपत्र देत नाहीत. असे मागणीपत्र ब्रिटनमधील हिंदूंनी देणे, हे कौतुकास्पद आहे !
  • भारतातील हिंदु संघटनांनी ब्रिटनमधील हिंदु संघटनांकडून आदर्श घ्यायला हवा आणि या मागण्या मान्य करणार्‍या पक्षाला अन् उमेदवारांना मते द्यायला हवीत, तरच हिंदूंचा दबावगट निर्माण होईल !