Muslims Oppose Excavation Bhojshala : धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेमधील उत्खननाला मुसलमानांचा विरोध !

काळ्या पट्ट्या बांधून केले नमाजपठण !

धार (मध्यप्रदेश) – येथील भोजशाळेत चालू असलेल्या उत्खननाला मुसलमान समुदायाने विरोध दर्शवला आहे. यासाठी मुसलमान २४ मे २०२४ या दिवशी काळ्या पट्ट्या बांधून धारच्या भोजशाळेत नमाजपठणासाठी जमले. असे खोदकाम करणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचेे उल्लंघन असल्याचा आरोप मुसलमानांनी केला आहे.

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, भारतीय पुरातत्व विभाग गेल्या ६४ दिवसांपासून भोजशाळेत सर्वेक्षण करत आहे. हिंदु समाजातील लोक ११ व्या शतकातील स्मारक असलेल्या याभोजशाळेला श्री वाग्देवीचे (श्री सरस्वतीदेवीचे) मंदिर मानतात, तर मुसलमान समुदाय त्याला कमल मौला मशीद म्हणतो.

प्रतिकात्मक चित्र

मुसलमान ज्याला कमल मौलाच्या मशिद म्हणतात त्याचे अधिकारी जुल्फिकार पठाण यांनी नमाजपठणानंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, उत्खनन न करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही भारतीय पुरातत्व विभागाने खोदकाम चालू ठेवले आहे आणि त्यामुळे मशिदीच्या भिंती कमकुवत होत आहेत. हिंदु पक्षाचे अधिवक्ता शिरीश दुबे यांनी म्हटले आहे की, मुसलमान समुदायाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविषयी चुकीचा समज करून घेतला आहे.

मुसलमान समुदायातील नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने भोजशाळा परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यासमवेतच परिसराचा मूळ ढाचा पालटणारे उत्खनन केले जाऊ नये, असे म्हटले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग सर्वेक्षण करत आहे.