गोव्यात कोरोनाच्या ‘के.पी.’ प्रकाराचे रुग्ण आढळले; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांची माहिती

पणजी, २२ मे (वार्ता.) – आझिलो रुग्णालयात कोरोनाबाधित ३० रुग्णांची चाचणी करण्यात आली असता त्यातील एक ‘के.पी.१’चा (ओमीक्रोनचा एक प्रकार) एक रुग्ण, तर ‘के.पी.२’चे ११ रुग्ण आढळले आहेत. ज्या रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते, ते सुमारे दीड महिना अगोदर घेण्यात आले होते आणि आता सर्व रुग्ण बरे झालेले आहेत, अशी माहिती आरोग्य सेवा संचालनालयाचे डॉ. धवल फातर्पेकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांचीही उपस्थिती होती. डॉ. बांदेकर म्हणाले, ‘‘ओमीक्रोनचे उत्परिवर्तन होऊन ‘के.पी.१’ हा विषाणू सिद्ध झाला आहे आणि हा मानवी जिवासाठी धोकादायक नाही. यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही.’’

डॉ. धवल फातर्पेकर पुढे म्हणाले, ‘‘के.पी.१’ विषाणू देशात सर्वत्र आढळत आहे आणि सध्या कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी हाच उत्तरदायी आहे. यामुळे संसर्ग वेगाने होत असला, तरी तो ‘डेल्टा’ विषाणूच्या तुलनेत मानवी जीवनासाठी अल्प धोकादायक आहे. ‘के.पी.१’ आणि ‘के.पी.२’ बाधित रुग्णांमध्ये केवळ तापाचे लक्षण आढळले आहे आणि त्यांच्यामध्ये एरव्ही कोरोनाची बाधा झाल्यावर दिसणारी अन्य लक्षणे दिसली नाहीत.’’ देशभरात आतापर्यंत ‘के.पी.१’चे ३४, तर ‘के.पी.२’चे २९० रुग्ण आढळले आहेत. सिंगापूर येथे सध्या कोरोनाचा कहर चालू असून याला ‘के.पी.१’ आणि ‘के.पी.२’ हे विषाणू उत्तरदायी आहेत.’’