Petition In Agra Court : फतेहपूर सिक्रीतील दर्ग्याच्या ठिकाणी मां कामाख्या देवीचे मंदिर !

आगरा (उत्तरप्रदेश) येथील न्यायालयात प्रविष्ट याचिकेतून दावा !

सलीम चिश्ती यांचा दर्गा की कामाख्या मंदिर ? आग्रा कोर्टात नवी याचिका दाखल !

आगरा (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील आगर्‍यातील जगप्रसिद्ध ताजमहाल हे मूळचे हिंदूंचे ‘तेजोमहालय’ नावाचे मंदिर आहे. आता आगर्‍यापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या फतेहपूर सिक्रीचे प्रकरण समोर आले आहे. तेथील शेख सलीम चिश्ती दर्गा हे मूळचे मां कामाख्या देवीचे मंदिर असल्याचा दावा एका याचिकेच्या माध्यमातून आगरा येथील स्थानिक न्यायालयात करण्यात आला आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. ९ मे या दिवशी अधिवक्ता अजय प्रताप सिंह यांनी न्यायालयात हा दावा प्रविष्ट (दाखल) केला.

अधिवक्ता अजय प्रताप सिंह

याचिकेत माता कामाख्या अस्थान, आर्य संस्कृती संरक्षणम् ट्रस्ट, योगेश्‍वर श्री कृष्ण कल्चरल रिसर्च ट्रस्ट, क्षत्रिय शक्तीपीठ विकास ट्रस्ट आणि अधिवक्ता अजय प्रताप वादी बनले आहेत. या प्रकरणात उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, व्यवस्थापन समिती दर्गा सलीम चिश्ती आणि व्यवस्थापन समिती जामा मशीद यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

देवीचे मंदिर असल्याचे ऐतिहासिक दस्तऐवज !

अधिवक्ता अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की,

१. सलीम चिश्ती दर्ग्यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. फतेहपूर सिक्रीचा दर्गा हे मां कामाख्या देवीचे मूळ गर्भगृह आहे आणि जामा मशीद परिसर हा मूळ मंदिराचा परिसर आहे. सीकरवारांची कुलदेवता मां कामाख्या देवीचे मंदिर येथेच असायचे. रावधम देव हे खानवाच्या युद्धाच्या वेळी तेथील राजे होते. त्यांच्या इतिहासात याचा उल्लेख आढळतो.

२. ‘बाबरनामा’मध्ये फतेहपूर सिक्रीच्या बुलंद दरवाजाच्या नैऋत्य भागात एक अष्टकोनी विहीर आहे आणि पश्‍चिम-पूर्वेला एक गरीब घर आहे. बाबरने ‘बाबरनाम्या’त ते बांधण्याचा उल्लेख केला आहे. अष्टकोनी विहीर ही हिंदु वास्तुकला आहे.

(सौजन्य : The Big Faces)

३. विदेशी इतिहासतज्ञ ई.व्ही. हॅवेल यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, जामा मशिदीचे छत आणि खांब ही शुद्ध हिंदु कलाकृती (डिझाइन) आहे.

४. ‘भारतीय पुरातत्व विभागा’चे आगर्‍याचे माजी अधीक्षक डॉ. डी.व्ही. शर्मा यांनी वीर छावेली टिळ्यासाठी या भागात उत्खनन केले होते. उत्खननाच्या वेळी त्यांना सरस्वती आणि जैन शिल्पांच्या मूर्ती सापडल्या. या आधारे डॉ. शर्मा यांनी ‘फतेहपूर सिक्री न्यू डिस्कव्हरी’चे ‘पुरातत्व’ नावाचे पुस्तक लिहिले. जामा मशीद ही हिंदु स्तंभांवर बांधलेली असल्याचे पुस्तकाच्या पान क्रमांक ८६ वर स्पष्टपणे लिहिले आहे.