३ आस्थापनांचा ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना रहित, तर ४ आस्थापनांना नोटीस

गोव्यात ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

(‘कन्सेंट टू ऑपरेट’ म्हणजे व्यवसाय करण्याची संमती)

पणजी, १८ डिसेंबर (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कर्णकर्कश संगीत वाजवून ध्वनीप्रदूषण करणारे ‘बार अँड रॅस्टॉरंट’ आणि अन्य आस्थापने यांच्यावर धडक कारवाई चालू केली आहे. मोठ्या आवाजात संगीत वाजवणार्‍या ३ आस्थापनांचा ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना रहित करण्यात आला आहे, तर ४ आस्थापनांना परवाना रहित करण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘हवा प्रदूषण आणि नियंत्रण कायदा १९८१’चे कलम ३१ (अ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

‘मेसर्स टेल्मा डिसा’ (शिवोली), मेसर्स नोहा (हणजूण) आणि मेसर्स डायज (हणजूण) यांची ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना रहित करण्यात आला आहे. या आस्थापनांना ‘प्रतिदिन १० सहस्र रुपये याप्रमाणे दंड का ठोठावला जाऊ नये ?’ अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. या आस्थापनांना यासंबंधी आता स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तसेच ‘मेसर्स विस्ता मारे’ (हणजूण), ‘डिज’ (शिवोली), ‘डायना बिल्डवेल’ (हणजूण) आणि ‘हिल टॉप’ (वागातोर) यांना सध्या आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आस्थापनांना २० डिसेंबर या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर त्यांची बाजू मांडावी लागणार आहे. यानंतर या आस्थापनांना ‘कन्सेंट टू ऑपरेट’ परवाना देण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे.