कोकण रेल्वे स्थानकांची देखभाल, दुरुस्ती आणि नूतनीकरण यांसह अन्य कामांसाठी अनुदान द्या !

खासदार रविंद्र वायकर यांच्या लोकसभेत मागण्या

खासदार रविंद्र वायकर

नवी देहली – कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरुस्ती, देखभाल आणि नूतनीकरण करण्यासाठी, कोळी बांधवाना अनुदान देण्यासाठी, तसेच मुंबई पोलीस दलाला आधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्यासाठी  केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उत्तर पश्‍चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत पुरवणी माणग्यांवर बोलतांना केली.

वर्ष २०२४-२०२५ च्या पुरवणी मागण्यांवर लोकसभेत सोमवार, १६ डिसेंबरला चर्चा उपस्थित करण्यात आली. या वेळी खासदार रविंद्र वायकर यांनी मुंबई, महाराष्ट्र, तसेच लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे काही विषय मांडून निधीची मागणी केली. यात मुंबई विमानतळ नवीन धावपट्टी (रनवे), तसेच विमानतळाचा विस्तार करणे, महाराष्ट्रातील प्रत्येक गाव दूरसंचार नेटवर्कच्या माध्यमातून जोडण्यात यावे, मुंबईत विशेष न्यायालय उभारणे, सागरमाला योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी जवळील सगळ्या बंदरांचा विकास करणे, मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणे, तसेच मुंबईत नवीन रुग्णालय आणि जुन्या रुग्णालयांची देखभाल दुरस्ती यांसाठी निधी देण्यात यावा आदी मागण्याही खासदार वायकर यांनी या वेळी केल्या.