घरात मोठा खड्डा, तसेच लिंबू, चामड्याची चप्पल, कवड्या, बिब्बे, कोयता, सुरी आदी साहित्य सापडले !
कुडाळ – तालुक्यात आंबेडकरवाडी, हिर्लोक येथे एका घरात अघोरी कृत्य केले जात असल्याची चर्चा काही दिवस चालू होती. याविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्या घरात खोल खड्डा खणल्याचे, तसेच त्याच्या बाजूला काही साहित्याची पूजा केलेली दिसली. तेथे अन्य साहित्यही सापडले. ‘गृहदोष दूर करण्यासाठी आणि मूल होत नसल्याने एका दांपत्याकडून हे सर्व केले जात होते’, अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित दांपत्यासह एकूण ५ जणांना अटक केली आहे. या सर्वांना १८ डिसेंबर या दिवशी येथील न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव यांच्या रहात्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली असून घरात जादूटोणासदृश्य अघोरी कृत्य केला जात असल्याचा दाट संशय आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहिले असता घरात मोठा खड्डा खणल्याचे, तसेच त्याच्या बाजूला लिंबू, पान-सुपारीचे विडे, हळद-पिंजर, नारळ, फळे, फुले, तीळ, बर्फी, पणत्या, अबीर, डमरु, रुद्राक्ष माळ, चामड्याचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, छोट्या काठ्या, घोंगड्याचे तुकडे, कवडे, बिब्बे आदी साहित्य, तसेच कोयता आणि सुरी अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली. या वेळी घरात विशाल विजय जाधव आणि त्यांची पत्नी सौ. हर्षाली विशाल जाधव (सध्या रहाणार ठाणे, मूळ रहाणार हिर्लोक-आंबेडकरवाडी), सुस्मित मिलिंद गमरे (रहाणार पातेपिलवली, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी), अविनाश मुकुंद संते आणि दिनेश बालाराम पाटील (दोघे रहाणार दिवारोड, डोंबिवली (पूर्व)) हे सापडले.
या वेळी पोलिसांनी त्यांना विचारले असता, ‘विशाल विजय जाधव यांच्या घरास गृहदोष असल्याने, तसेच त्यांची पत्नी सौ. हर्षाली यांना मूलबाळ होत नसल्याने त्यांची पिडा दूर करण्यासाठी ही पूजा केली’, असे संशयितांनी मान्य केल्याचे पोलीस निरीक्षक मगदूम यांनी सांगितले; मात्र पोलिसांचे समाधान न झाल्याने या सर्वांना अटक करण्यात आली. या वेळी संशयित आरोपी वापरत असलेली ‘इको कार’ कह्यात घेतली. पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.
याविषयी पालीस निरीक्षक मगदूम यांनी सांगितले की, गेल्या २ महिन्यांपासून हा प्रकार चालू आहे. सद्य:स्थितीत तेथे नरबळीचा प्रकार झाल्याचे आढळले नाही; मात्र तसा काही प्रकार होता का ? याविषयी माहिती घेण्याचे काम चालू आहे.