हुतात्म्यांच्या पहिल्या पिढीतील प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांचा भेटनिधी आणि दिले सन्मानपत्र
पणजी, १८ डिसेंबर (वार्ता.) – गोवा मुक्तीच्या लढ्यात प्राणांची आहुती देणार्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची नोंद घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील स्थानिक आणि देशातील अन्य राज्यांतील १५ हुतात्म्यांच्या पहिल्या पिढीतील कुटुंबियांचा १८ डिसेंबर या दिवशी पर्वरी येथील विधानसभा संकुलात एका विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांचा भेटनिधी आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘जर गोवा राज्याला भारतासमवेत म्हणजे वर्ष १९४७ मध्येच स्वातंत्र्य मिळाले असते, तर ७४ स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले नसते. गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलीदान देणार्या ७४ हुतात्म्यांची सरकारने माहिती गोळा केली आहे. यासंबंधी माहिती ‘वू ईच वू’ (स्वातंत्र्यसैनिकांविषयी माहिती असलेली पुस्तिका) या पुस्तिकेच्या माध्यमातून गोमंतकियांच्या समोर आणली आहे. गोवा मुक्तीनंतर ६३ वर्षांनी हुतात्म्यांचे स्मरण म्हणून आज १५ जणांचा गौरव केला जात आहे. या ७४ हुतात्म्यांचा गोवा मुक्तीलढ्यात मोठा वाटा होता; मात्र त्यांच्या कुटुंबियांना पुढे योग्य बहुमान प्राप्त झालेला नाही. जो इतिहास विसरतो, तो प्रगती करू शकत नाही. यानुसार ७४ हुतात्म्यांचे बलीदान पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पत्रादेवी येथील स्मारकावर या ७४ हुतात्म्यांची नावे कोरली जाणार आहेत आणि यामुळे याची इतिहासात नोंद रहाणार आहे. गोवा सरकारने ‘कुंकळ्ळीचा उठाव’, ‘पिंटोंचा उठाव’ आणि ‘दीपाजी राणे यांचे बंड’ यांना राज्यमान्यता दिली आहे. हा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न आहे.’’ ‘गोव्याबाहेर राहूनही स्वातंत्र्यसैनिक शेषनाथ वाडेकर आणि तुळशीराम हिरवे गुरुजी यांचे कुटुंबीय गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहातात; परंतु सरकारी नोकरी मिळालेली गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांची मुले कार्यक्रमाला अनुपस्थित असतात’, अशी खंत या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.