भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सांगली – कृष्णा नदीच्या पात्रात शेरीनाल्याचे पाणी मिसळून प्रदूषण होते, ते रोखण्यासाठी नवीन प्रस्तावित मलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनात शेरीनाल्यामुळे होणारे कृष्णा नदीचे प्रदूषण या विषयाकडे आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
शेरीनाल्यामुळे कृष्णा नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी. नदी प्रदूषणास उत्तरदायी असणारे घटक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी या वेळी केली. या प्रस्तावासमवेत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील, तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित प्रस्तावांविषयी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मागण्यांविषयी शासन तातडीने सकारात्मक कार्यवाही करील’, असे आश्वासन आमदार गाडगीळ यांना दिले.