‘हिंदु सेवा महोत्सवा’मध्ये हिंदु संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा यांचे विराट दर्शन होणार ! – कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष

१९ ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये पुणे येथे महोत्सव

१९ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज इत्यादींच्या हस्ते उद्घाटन होईल. २२ डिसेंबर या दिवशी होणार्‍या संत संमेलनाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित रहातील.

बोलतांना ‘हिंदु सेवा महोत्सवा’चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल (मध्यभागी), डावीकडून राधेश्याम अग्रवाल, किशोर येनपुरे, अशोकभाई गुंदेचा, चरणजितसिंह सहाणी, संजय भोसले, पंडित शिवकुमार शास्त्री

पुणे, १८ डिसेंबर (वार्ता.) – प्रत्येक हिंदु, आध्यात्मिक संस्था, मंदिरे, देवस्थान आणि मठ हे आपल्या स्तरांवर धर्माचे कार्य करत असतात. त्यांच्या संस्थांच्या माध्यमांतून चालणारे कार्य, हे समाजाला ठाऊक व्हावे. सनातन हिंदु संस्कृतीची पुन्हा एकदा नव्याने ओळख व्हावी. हिंदु, जैन, शीख आणि बौद्ध धर्मांतील विविध कार्य लोकांसमोर यावेत, हाच मुख्य उद्देश ठेवून पुणे येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर ‘हिंदु सेवा महोत्सवा’चे १९ ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजन केले आहे. यातून हिंदु संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा कार्याचे विराट दर्शन घडणार आहे, अशी माहिती ‘हिंदु सेवा महोत्सवा’चे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल यांनी दिली. ते ‘हॉटेल कोरोनेट’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ‘हिंदु आध्यात्मिक सेवा संस्था’ आणि ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ‘हिंदु आध्यात्मिक सेवा संस्थे’चे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार, ‘इस्कॉन’चे संजय भोसले, ‘स्वामीनारायण मंदिरा’चे राधेश्याम अग्रवाल, शीख समाजाचे चरणजितसिंह सहानी उपस्थित होते.