केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोप !
नवी देहली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १७ डिसेंबर या दिवशी राज्यसभेत बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या एका विधानावरून विरोधकांनी संसदेत आणि बाहेर विरोध टीका चालू केली आहे. या टीकेला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, ‘भारताच्या नागरिकांनी वेळोवेळी पाहिले आहे की, काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटील गोष्टी केल्या आहेत.’ अमित शहा यांनी, ‘आजकाल आंबेडकर यांचे नाव सारखे सारखे घेणे ही ‘फॅशन’ झाली आहे’, असे विधान केले होते.
१. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील त्यांच्या पोस्टमध्ये काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या प्रकारांची सूचीच दिली आहे. यात एकदा नसून दोनदा डॉ. आंबेडकर यांचा निवडणुकांमध्ये पराभव करणे, नेहरूंनी डॉ. आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार करणे आणि त्यांचा पराभवाचे सूत्र मोठे करणे, डॉ. आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ नाकारणे, संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यास नकार देणे इत्यादी गोष्टींचा या सूचीत समावेश आहे.
२. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, अमित शहा यांनी मांडलेल्या तथ्यांमुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळेच त्यांनी हे नाटक चालू केले आहे; पण लोकांना सत्य काय आहे याची पूर्ण कल्पना आहे.