धनबाद (झारखंड) – सध्याच्या काळात बहुतांश मुले अंतर्गत स्पर्धेमुळे तणावग्रस्त राहून अभ्यास करतांना दिसून येतात. ते मन लावून अभ्यास करू शकत नाहीत. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यास ते दु:खी होतात. त्यामुळे त्यांच्यात परत अभ्यास करण्याचा उत्साह रहात नाही. त्यातून त्यांना परत अपयश मिळते आणि या दुष्ट चक्रामध्ये ते फसत जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणाव दूर करून आदर्श राष्ट्रभक्त नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी विद्यार्थ्यांना केले. येथील ‘धनबाद पब्लिक स्कूल’मध्ये ‘तणावमुक्तीसाठी व्यक्तीमत्त्व विकास आणि अभ्यास कसा करावा ?’, या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरस्वती शिशु मंदिर, शामडीहचे अध्यक्ष तथा कतरासचे प्रसिद्ध उद्योगपती तथा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा लाभ ‘धनबाद पब्लिक स्कूल’च्या मुख्य शाखेचे १० वी ते १२ वीचे विद्यार्थी, तसेच शिक्षक यांनी घेतला.
या वेळी सद्गुरु सिंगबाळ यांनी अभ्यास चांगला होण्यासाठी, तसेच परीक्षेत यश मिळण्यासाठी काय करावे ? अभ्यासाचा ताण दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ? जीवनात आनंद मिळवण्यासाठी नामजप साधनेचे महत्त्व, स्वभावदोष प्रक्रिया राबवून आदर्श कसे बनावे ? इत्यादींविषयी मार्गदर्शन केले.