सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

श्रीराम पंचायत मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त सजवलेल्या मूर्ती

सिंधुदुर्ग : अयोध्येत श्रीराममंदिर व्हावे आणि रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित व्हावी, ही गेल्या अनेक शतकांची हिंदूंची इच्छा यावर्षी पूर्ण झाली. त्यामुळे यावर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतांना रामभक्तांचा आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता. या आनंदात १७ एप्रिल या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भजन, कीर्तन, प्रवचन, श्रीरामनाम संकीर्तन यांमुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले होते.

पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रम

पानवळ, बांदा येथील श्रीराम पंचायतन मंदिरात सकाळी नित्यपूजन, अभिषेक, दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव, आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद, तसेच रामजन्माचे कीर्तन, भजन, भक्तीसंगीत आणि गीत रामायण, असे कार्यक्रम झाले. या सोहळ्याच्या आयोजनात स्थानिक ग्रामस्थ आणि भक्त यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

सावंतवाडी शहरात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने रामजन्मोत्सव झाल्यानंतर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी गीतरामायण आणि दशावतारी नाट्यप्रयोग, असे कार्यक्रम झाले. कुडाळ शहरात श्री कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ तालुक्यात वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर, मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, कसाल येथील श्री पावणाई मंदिर, देवगड तालुक्यात जामसंडे, भटवाडी येथील शिवकालीन श्रीराम मंदिर, कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिर, मारुतिवाडी, फोंडाघाट येथील श्री विठ्ठल मंदिर, मालवण तालुक्यातील आचरा येथील संस्थानकालीन श्री रामेश्वर मंदिर यांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात काही ठिकाणी सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आणि विक्री कक्ष उभारण्यात आले होते. याला भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

पानवळ, बांदा येथील श्रीरामनवमी उत्सवास संतांची वंदनीय उपस्थितीत !

सावंतवाडी तालुक्यातील पानवळ, बांदा येथील श्रीराम पंचायत मंदिरात झालेल्या श्रीरामनवमी उत्सवास प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, फोंडा (गोवा) येथील सनातनच्या संत पू. सुमन (मावशी) नाईक आणि पू. संकेत कुलकर्णी या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या वेळी संतांचा सन्मान करण्यात आला.

डावीकडून सद्गुरु सत्यवान कदम, रामाच्या पाळण्याला झोका देतांना प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी नाईक आणि पू. सुमन नाईक

अविरत आणि भावपूर्ण सेवा करणारे गजानन डेगवेकर यांचा सत्कार

श्री. भाई डेगवेकर यांचा सत्कार करतांना सद्गुरु सत्यवान कदम

प.पू. दास महाराज यांचे मेहुणे आणि पू. (सौ.) लक्ष्मी (भाई) नाईक यांचे जेष्ठ बंधू  श्री. गजानन (भाई) डेगवेकर (वय ८४ वर्षे) हे वर्ष १९७२ मध्ये श्रीराममंदिराच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत मंदिरात अविरत सेवा करत आहेत. त्याच्या सेवेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते भावपूर्ण सेवा करतात. ही सेवा करत असतांना ते मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीशी आणि येथील गौतमारण्य आश्रमात असलेल्या श्री गजानन महाराज महाराज यांच्या मूर्तीशी बोलत असतात. अशी भावपूर्ण आणि अविरत करणारे श्री. डेगवेकर यांचा सत्कार सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते करण्यात आला.