(टीप : ‘एआय’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता !)
सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाने विविध क्षेत्रांमध्ये प्रगती आणि कार्यक्षमता वाढवण्याविषयी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत; परंतु या तांत्रिक क्रांतीच्या साहाय्याने सध्या जगात विविध देशांत होणार्या निवडणुकींच्या कालावधीत गैरसमज पसरवून फूट पाडणे आणि हानी करणे यांमध्ये चीनचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. भारत, अमेरिका, कॅनडा वगैरे देशांतील निवडणुकीच्या वेळी चीनकडून होणारा हस्तक्षेप काळजीत टाकणारा आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेला सुरूंग लावण्यासाठी आणि शत्रूराष्ट्रांमधील नावडती सरकारे पाडण्यासाठी चीनकडून जनमताविषयीच्या माहितीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून पालट केला जात आहे. खोटी कथानके (नॅरेटिव्ह) आणि चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमांच्या माध्यमातून मतभेद निर्माण करून राजकीय निकालांवर स्वतःचा प्रभाव वाढवणे यांसाठी चीनकडून प्रयत्न केला जात आहे. चीनकडून पद्धतशीरपणे केल्या जाणार्या या प्रयत्नांवर ‘मायक्रोसॉफ्ट’ या प्रथितयश आस्थापनाने प्रकाश टाकला आहे.
१. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे चीन भारतातील लोकशाही संस्थांचे विघटन करण्याची शक्यता
भारतातील आगामी निवडणूकीतही चीन कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून चुकीची माहिती पसरवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. चीन कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून, खोटी कथानके पसरवून आणि जनतेचे लक्ष दुसर्या ठिकाणी वळवून सरकारची अपकीर्ती करण्याचे प्रयत्न करत आहे. चीनकडून मुद्दाम केल्या जाणार्या या हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेतील केवळ अखंडता भेदू पहात नाही, तर भारतातील लोकशाही संस्थांचे विघटन करून त्यांचे देशातील सार्वभौमत्व धोक्यात आणू पहात आहे. अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या राष्ट्रांतील निवडणुकांच्या वेळी हस्तक्षेप करण्याचा चीनचा इतिहास असल्याने या विषयाचे गांभीर्य अधोरेखित होत आहे. चीनच्या हस्तक्षेपाविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी चीनच्या व्यत्यय आणण्याच्या वागणुकीविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीरपणे चिंता व्यक्त केली आहे. खोट्या बातम्या प्रसारित करणे, सामाजिक माध्यमांच्या व्यासपिठावर पालट करणे आणि विशिष्ट ध्येय ठेवून प्रसाराची मोहीम करणे, ही चीनकडून निवडणुकांच्या कालावधीत कृत्रिम बुद्धीमत्तेचा दुरुपयोग करून केलेल्या कृतींची उदाहरणे आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत आल्गोरिदमच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ क्षेत्रामध्ये कुठे फूट पडू शकते ? ते ओळखून फूट पाडणारी खोटी कथानके पसरवून मतदारांना आपल्याला अनुकूल असलेल्या मताकडे वळवण्याचा प्रयत्न चीन करत असतो.
२. चीनकडून ‘एआय’चा होत असलेला गैरवापर थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक
निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या पलीकडे जाऊन चीनकडून स्वतःचा प्रभाव वाढवणे आणि जगभरातील लोकशाही मूल्यांना सुरूंग लावणे या भूराजकीय उद्देशाने कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला जात आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता हे हत्यार वापरून चीन माहितीच्या प्रवाहांवर स्वतःचे नियंत्रण ठेवू इच्छित आहे, तसेच चीनच्या मताशी मतभेद असलेल्यांचा आवाज दाबून टाकून जागतिक स्तरावर स्वतःला अनुकूल असलेली कथानके पसरवू पहात आहे. विनाशक कार्यासाठी चीनकडून होत असलेला कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर हा पुष्कळ प्रमाणात वाढला असून आंतरराष्ट्रीय समूहांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
३. ‘एआय’मुळे होणार्या परिणामांविषयी लढा देण्यासाठी उपाययोजना हवी !
लोकशाहीविषयी प्रक्रिया अभेद्य आणि सुरक्षित राखून विदेशाकडून केला जाणारा हस्तक्षेप थांबवण्यासाठी परिणामकारक पद्धतीने प्रतिकार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे चुकीची माहिती दिल्याने होणार्या परिणामांशी लढा देण्यासाठी सरकार, तांत्रिक आस्थापने आणि जनता यांनी भक्कम धोरण आखले पाहिजे.
४. चीनच्या द्वेषयुक्त वागणुकीचा निषेध करणे महत्त्वाचे !
सारांश म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून शोषण करण्याचे चीनचे धोरण जगातील लोकशाही आणि मुक्त अन् योग्य पद्धतीने घेतली जाणारी निवडणूक यांसाठी अतिशय धोकादायक आहे. जगभरात नैतिक दृष्टीकोन राखून कृत्रिम बुद्धीमत्ता वापरावी याला प्राधान्य दिले जात असल्याने लोकशाहीची मूलभूत मूल्ये, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याला पाठिंबा देऊन चीनच्या द्वेषयुक्त वागणुकीचा निषेध करणे अत्यावश्यक आहे. हे जर झाले नाही, तर लोकशाही या जगमान्य व्यवस्थेला सुरूंग लागून निवडणुकांच्या निकालात हवा तसा पालट करणे आणि त्यावर नियंत्रण करणे यांसाठी हुकूमशहांच्या सत्तेला बळ दिल्यासारखे होईल.
– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (६.४.२०२४)
संपादकीय भूमिकाचीन भारतात विविध मार्गांनी करू पहात असलेली घुसखोरी कायमची थांबवण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे ! |