हिंद महासागरात चीनने तैनात केल्या आहेत हेरगिरी करणार्‍या ३ नौका !

भारताचे नौदलही आहे सतर्क !

नवी देहली – दक्षिण चीन समुद्रात तेथील देशांवर सागरी दबाव आणल्यानंतर चीनने आता हिंदी महासागर क्षेत्रात किमान ३ चिनी सर्वेक्षण आणि पाळत ठेवणार्‍या नौका तैनात केल्या आहेत. चीनला वर्ष २०२५ पर्यंत हिंदी महासागरात गस्त घालायची आहे. अलीकडे भारतीय नौदलानेही हिंदी महासागरात ११ पाणबुड्या आणि ३५ युद्धनौका तैनात केल्या आहेत. यासमवेतच अरबी समुद्रातही भारतीय नौदलाच्या हालचाली वाढल्या असून अनेक नौकांना समुद्री दरोडेखोरांपासून वाचवले आहे. अमेरिकी तज्ञांनी हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींबाबत चिंता व्यक्त केली आहे.

चीनने कुठे तैनात केल्या आहेत नौका ?

१. ‘हिंदुस्तान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, चीनने पहिली नौका ‘जियांग यांग हाँग ०१’ बंगालच्या उपसागरापासून ५०० मैल पश्‍चिमेला आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात केली आहे. चीनची ही हेरगिरी करणारी नौका ८ मार्चपासून येथे तैनात आहे. या चिनी नौकेचे काम १२ किलोमीटर पाण्याखाली काम करणार्‍या पाणबुड्यांचे परीक्षण करण्याचे आहे. चीनला या नौकेच्या साहाय्याने समुद्राच्या तळाचा नकाशा बनवायचा आहे.

२. चीनची दुसरी गुप्तचर नौका ‘जियांग यांग हाँग ०३’ मालदीवमध्ये तैनात आहे. ती तेथून ३५० मैल अंतरापर्यंत सागरी निरीक्षण आणि हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करत आहे. ही नौका ३ महिन्यांपूर्वी हिंदी महासागरात पाठवण्यात आली होती. भारतीय नौदल या चिनी नौकेवर लक्ष ठेवून आहे.

३. चीनने मॉरिशसमधील पोर्ट लुईसच्या दक्षिणेस १ सहस्र २०० मैलांवर ‘दा यांग हाओ’ ही तिसरी गुप्तचर नौका तैनात केली आहे. यासमवेतच चिनी नौदलाचे समुद्री दरोडेखोरांच्या विरोधातील पथक एडनच्या आखातात काम करत आहेत; मात्र आतापर्यंत चीनने कोणत्याही समुद्री दरोडेखोरांना रोखल्याची कोणतीही बातमी आलेली नाही. अशा परिस्थितीत भारतही या चिनी नौकांवर लक्ष ठेवून आहे.