फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आवाहन !
फ्रान्स (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युरोपचे शत्रू आहेत. युक्रेनवर विजय मिळवल्यानंतरही ते थांबणार नाहीत. त्यामुळे युरोपातील लोकांनी कच न खाता रशियाला खंबीरपणे उत्तर देण्यासाठी सिद्ध रहावे, असे आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केले. एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॅक्रॉन म्हणाले, ‘‘रशियाने युक्रेनसमवेतचे युद्ध जिंकले, तर युरोपची विश्वासाहर्ता शून्यावर येईल.’ त्यांच्या विधानानंतर फ्रान्समधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली असून ‘मॅक्रॉन युद्धखोरीची भाषा बोलत आहेत’ असे म्हटले आहे.
मॅक्रॉन यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना म्हटले की,
१. मी विरोधकांच्या मताशी असहमत आहे. आज युक्रेनला पाठिंबा देण्यापासून दूर राहून किंवा युक्रेनच्या साहाय्याच्या विरोधात मतदान करण्यासारखा निर्णय घेऊन आपण शांतता निवडत नसून पराभव निवडत आहोत. जर युरोपमध्ये युद्धाची ठिणगी पडली, तर त्यास रशिया उत्तरदायी असेल.
२. जर आपण आज मागे रहाण्याचा किंवा घाबरून बसण्याचा निर्णय घेतला, तर आपण आजच पराभव स्वीकारत आहोत, असे मी मानतो आणि मला हे मान्य नाही. मला वाटते रशियाने हे युद्ध तात्काळ थांबवावे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे.
३. फ्रान्स रशियाविरुद्ध कधीही युद्ध छेडणार नाही. उलट रशियाने फ्रान्सचे हितसंबंध असलेल्यांवर आक्रमण केल्यानंतरही आम्ही रशियाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली नाही.
४. युक्रेन आज कठीण परिस्थितीला तोंड देत असून त्याला मित्र राष्ट्रांकडून साहाय्याची आवश्यकता आहे. शांततेचा अर्थ असा नाही की, युक्रेनने आत्मसमर्पण करावे. शांतता हवी आहे; म्हणून पराभव स्वीकारणे योग्य नाही. जर शांतता हवी असेल, तर युक्रेनला वार्यावर सोडून चालणार नाही.