भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग २)

भारत युएसएसआरची कठपुतळी कसा बनला ?

स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारताचा गेल्या ७६ वर्षांचा वस्तूनिष्ठ इतिहास ‘हिंदु’ जगासमोर अभावानेच कुणी मांडला असेल. हे लक्षात आणून देणारा ‘प्राच्यम् स्टुडिओज’ने प्रसारित केलेल्या व्हिडिओतून अत्यंत सुरेखपणे सांगण्यात आले आहे.

‘प्राच्यम् स्टुडिओज’चे प्रमुख कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांच्या विशेष सौजन्याने या व्हिडिओची संहिता आमच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.

याचा पहिला भाग आपण ३ मार्च या दिवशीच्या अंकात वाचला. त्यामध्ये ‘भारताच्या बुद्धिबळाचा एक नवीन सारीपाट’, ‘सांस्कृतिक अभिशाप :  आधुनिकतेने घेतले वसाहतवादाचे रूप’, ‘इंग्रजांची सत्ता जाऊन त्यांच्या स्थानी आली नवीन उच्चभ्रू नेत्यांची सत्ता’ ही सूत्रे पाहिली. आज याचा पुढील भाग पाहूया.

(हा व्हिडिओ जगातील पहिले हिंदु ओटीटी असलेल्या ‘प्राच्यम्’वर विनामूल्य पहाता येऊ शकते. भ्रमणभाषवरून prachyam.com वरून हा व्हिडिओ हिंदू पाहू शकतात. या व्हिडिओचे नाव आहे – ‘साहेब’ जे कधी गेलेच नाहीत : भाग २ – परिणाम.’ भाग-१ मधून स्वातंत्र्याच्या आधी १००० वर्षांचा हिंदुद्वेषी इतिहास दाखवण्यात आला आहे. त्याचा लेख एप्रिल २०२३ मध्ये ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.)(भाग २)

रशियाच्या ‘केजीबी’चे (गुप्तचर संस्था) हातचे खेळणे झालेला भारत !

‘१९७० च्या दशकात सोव्हिएत संघाचा व्यावसायिक प्रचार (प्रोपगेंडा) करणारे युरी बेझमेनोव्ह अलेक्झांड्रोव्हीच अमेरिकेला शरण आले. ‘केजीबी’ने संपूर्ण जगात साम्यवादी विचारसरणी पसरवण्यासाठी अत्यंत भयावह पद्धती वापरल्या होत्या. बेझमेनोव्ह यांनी ती सर्व गुपिते जगासमोर उघड केली. ‘केजीबी’चे मुखपत्र मानले जाणारे ‘नोवोस्टी’मध्ये त्यांची उत्कृष्ट कारकीर्द राहिली होती. ते निश्चितच सोव्हिएत रशियाचा प्रचार (प्रोपगेंडा), तसेच रशियाच्या हितामध्ये असलेला ‘अपप्रचार’ (डिसइन्फॉर्मेशन) या विषयांवर जगातील आघाडीच्या तज्ञांपैकी एक होते.

युरी बेझमेनोव्ह सांगतात, ‘‘मी नवी देहलीतील सोव्हिएत दूतावासात ‘प्रसारमाध्यम (प्रेस) अधिकारी’ म्हणून कार्यरत होतो. माझी पहिली नोकरी ही बिहार आणि गुजरात या राज्यांतील रिफायनरी (तेल शुद्धीकरण करणारे कारखाने) उभारण्यासाठी कार्यरत ‘सोव्हिएत आर्थिक साहाय्य समूहा’मध्ये एक भाषांतरकार म्हणून होती. मला काही कामे करण्यास भाग पाडले गेले. उदाहरणार्थ लाचलुचपत आणि भ्रष्टाचार करणे, राजकारणी, खासदार, प्रभावशाली विद्वान, नागरी सेवेचे सदस्य (आय.ए.एस्. अधिकारी), व्यापारी यांच्याशी मैत्री करणे आदी. दुसर्‍या शब्दांत सांगायचे, तर कोणत्याही व्यक्ती ज्यांचा सोव्हिएत परराष्ट्र धोरणाच्या हितामध्ये भारतात सार्वजनिक मत बनवण्याशी संबंध आहे, अशा लोकांशी मैत्रीचे संबंध ठेवण्यास मला बाध्य करण्यात आले. आम्ही भारतात जे आणत होतो, तो एक नवीन प्रकारचा वसाहतवाद होता.

‘केजीबी’चे कुख्यात जनरल ओलेग कालुगिन यांच्या मते वर्ष १९७० चे दशक येता-येता जगभरात भारत ‘केजीबी’च्या घुसखोरीचे एक आदर्श उदाहरण बनले होते. असे वाटत होते, जणूकाही संपूर्ण देश विक्री होण्यास सज्ज झाला आहे.

जेव्हा रशियाचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी वसिली मित्रोखिन यांचे प्रसिद्ध ‘आर्काईव्ज’ (गुप्त माहिती असलेल्या कागदपत्रांचा संग्रह) सार्वजनिक झाले, तेव्हा काँग्रेस आणि केजीबी यांच्या छुप्या सहभागाचे शेकडो बारकावे जगासमोर आले. अर्थातच भारतात ही बातमी गुप्तपणे दडपण्यात आली.

(साभार : ‘प्राच्यम्’ हिंदु ओटीटी)

५. स्वातंत्र्य मिळवण्याच्या नावाखाली नेहरू आणि काँग्रेस यांच्याकडून अनेक गुप्त करार !

आपल्याला नेहमीच सांगितले गेले की, आपला देश वर्ष १९४७ मध्ये पूर्ण स्वतंत्र झाला; पण सत्य काही वेगळेच होते. स्वातंत्र्य मिळवण्याच्या नावाखाली नेहरू आणि काँग्रेस यांनी अनेक गुप्त करार केले, ज्यांना आजपर्यंत ब्रिटन अन् भारत सरकारांनी सार्वजनिक केले नाही.

प्रा. कपिल कुमार सांगतात, ‘‘इंग्रज लोक पुष्कळ चतुर आहेत आणि ते पुढील ५० वर्षांचे नियोजन करतात. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल डिकी माऊंटबॅटन बनले, जे नुकतेच बाल लैंगिक गुन्हेगार (पीडफाईल) असल्याचे आढळून आले. नेहरू सरकार आणि ब्रिटनची गुप्तचर संघटना ‘एम्आय ५’चे उपसंचालक गाय लीडेल यांच्यात करार झाले. त्यानुसार ‘एम्आय ५’ वर्ष १९७५ पर्यंत नवी देहलीत स्वतंत्र कार्यालय चालवत होती. भारताच्या दुसर्‍या गव्हर्नर जनरलची गोष्टही काहीशी अशीच होती. एडविना माऊंटबॅटन ही नेहरूंच्या पुष्कळ जवळची होती; पण राजगोपालाचारी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते. त्यानंतर राजगोपालाचारी यांना दुसरे गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. राजगोपालाचारीच का ? हा माणूस वर्ष १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या विरोधात होता. याच माणसाने फाळणीची योजना दिली होती, हे विसरू नका. त्या वेळी हेच राजगोपालाचारी त्या वेळच्या ब्रिटीश सरकारचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत होते, ज्या सरकारचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी बंगालमध्ये मानवनिर्मित दुष्काळाच्या माध्यमातून लक्षावधी भारतियांचा नरसंहार केला होता ! आपण हे सर्व विसरू शकतो का ?

६. जिना आणि मुस्लिम लीग यांच्या क्रूरतेमुळे नेहरू, मंत्रीमंडळ अन् नोकरशाही यांमध्ये भय !

सत्य हे आहे की, भारत एक नाही, तर दोन दोन वसाहतवादांमध्ये फसला आहे. आधी इस्लामी दरोडेखोरांचा आणि नंतर ख्रिस्ती ब्रिटीश साम्राज्यवादाचा ! सहस्रो वर्षांपासून कोडे खात खात सामान्य (हिंदु) जनता आणि ‘तपकिरीसाहेब’ (नेहरू) यांच्या मनात दोन प्रकारच्या भीती खोलवर बसल्या होत्या. एक इस्लामची भीती आणि दुसरी गोर्‍यांविषयी हीनतेची भावना ! वर्ष १९४० च्या दशकामध्ये महंमद अली जिना आणि मुस्लिम लीग यांच्या क्रूरतेमुळे नेहरू, मंत्रीमंडळ अन् नोकरशाही यांमध्ये भय निर्माण झाले होते. याच भयाने स्वातंत्र्यानंतरही भारताच्या सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक व्यवस्थांना आकार दिला.

७. शांततेचा मुखवटा घातलेली एक वैचारिक स्मशानशांतता !

आंतरराष्ट्रीय व्यवहारतज्ञ श्री. रुचिर शर्मा म्हणतात की, व्यवस्थेला जनतेने फाळणीच्या आठवणी विसराव्या, असे वाटले; कारण त्या अतिशय क्लेशदायक होत्या. व्यवस्थेला याचीही भीती होती की, जनतेला ५००-६०० वर्षांचा फाळणीपर्यंतचा सत्य इतिहास सांगितला, तर ‘रानटी’ मूळ निवासींच्या (हिंदूंच्या) भावना भडकतील आणि देश नियंत्रणाबाहेर जाईल. त्यामुळे गृहयुद्ध होईल !

शांतता २ प्रकारची असते. एक शांतता ती आहे, जी वादांवर योग्य तोडगा काढल्याने निर्माण होते. ते थोडे अवघड असले, तरी त्यामुळे सर्वांना न्याय मिळतो. दुसरी शांतता असते, शांतपणे सहन करणारी ! ही आणणे सोपे आहे; पण एक ना एक दिवस भावनांचा स्फोट होतो. नेहरूंना दुसर्‍या प्रकारची सोपी शांतता राखायची होती.

प्रसिद्ध रंगमंच सिद्धांतकार आणि संगीततज्ञ प्रा. भरत गुप्त यासंदर्भात सांगतात की, त्यामुळे नेहरूंनी देशाला ‘धार्मिक अल्पसंख्यांक’ आणि ‘धार्मिक बहुसंख्यांक’ यांच्यात विभागले. त्यांनी धर्मनिरपेक्षतावाद निर्माण केला, ज्याला भारतीय चिंतनामध्ये कोणताही आधार नाही. त्यामुळे लोकांनी संविधान सभेत विचारले, ‘तुम्ही ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ आणि ‘हिंदु पर्सनल लॉ’ का बनवत आहात ?’ भारतीय विचार योग्य, अयोग्य आणि धर्माविषयी बोलतो. ‘धारयति इति धर्मः’, म्हणजे जो धारण करतो, तोच ‘धर्म’ होय. तुम्ही समान नागरी संहिता का बनवू शकत नाही ?’ तेव्हा नेहरू म्हणाले, ‘‘नाही, आम्ही मुसलमानांना त्यांचे विचार पालटण्यास सांगू शकत नाही; कारण कुराणात असे म्हटले आहे की, ते कयामतच्या दिवसापर्यंत (विश्वाच्या अंतापर्यंत) तसेच राहील; पण आपण हिंदूंना कायदा सांगू शकतो.’’

नेहरूंचा धर्मिनरपेक्षतावाद अगदी सोपा होता. कुणाला मदरशांवर नियंत्रण हवे असेल, तर तो सांप्रदायिक; पण मंदिरावरील नियंत्रण म्हणजे धर्मनिरपेक्षता ! सोमनाथ मंदिराची पुनर्उभारणी सांप्रदायिक, तर गाझींच्या नावावर असलेले शेकडो रस्ते धर्मनिरपेक्ष ! नेहरूंसाठी शिकारचे आत्मरक्षण हेच शिकारी हिंसक होण्याचे मूळ कारण होते.

८. इतिहासाची छेडछाड करून देशाची दिशाभूल करण्यात मौलाना अबुल कलाम आझाद यांची महत्त्वाची भूमिका !

माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यावर प्रकाश टाकतांना सांगतात की, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भूमिकेविषयी देशाने पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले. हे स्वतःमध्येच एक विडंबन होते. आपल्या डोळ्यांपुढेच मोठ्या प्रमाणात इतिहासाची छेडछाड झाली. देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये आझाद यांच्या अयोग्य दृष्टीकोनाने भूमिका वठवली. मी हा आक्षेप संपूर्ण दायित्वाने नोंदवत आहे. अबुल कलाम आझाद यांचा सुफीवादावर विश्वास नव्हता. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात तसे लिहिले आहे. ते म्हणतात, ‘‘माझ्या वडिलांचा सुफीवादावर विश्वास असला, तरी माझा त्यावर विश्वास नव्हता. मी त्याला ‘जाहिलिय्यत’ (अज्ञान) म्हणत होतो.’’

९. सोव्हिएत युनियन आणि ‘केजीबी’यांची भारत सरकारमध्ये घुसखोरी !

‘सोव्हिएत कम्युनिस्ट ब्लॉक’ (साम्यवादी देशांचा संघ) १९५० च्या दशकापासून नेहरू सरकारमध्ये घुसखोरी करण्यात व्यस्त होते. त्या वेळी व्ही.के. कृष्णा मेनन, पी.एन्. हक्सर, ललित नारायण मिश्र यांसारखे दिग्गज सोव्हिएत गुप्तहेरीमध्ये सहभागी झाले; पण त्यांना सर्वांत मोठे यश पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या गूढ हत्येनंतर मिळाले, जेव्हा इंदिरा गांधी अचानक केंद्रात आल्या. सोव्हिएत रशियाची तत्कालीन गुप्तचर संस्था ‘केजीबी’ने इंदिरा गांधी यांचे कोडनेम (सांकेतिक नाव) ‘वानो’ ठेवले. राजकारणाचा अनुभव नसल्यामुळे ‘वानो’मध्ये ‘केजीबी’ला त्यांचा आदर्श ‘असेट’ (महत्त्वाचा माणूस) सापडला. (थोडक्यात इंदिरा गांधी या ‘केजीबी’च्या हस्तक बनल्या.) शीतयुद्धात भारताला स्वत:च्या पक्षात ठेवण्यासाठी रशिया ही काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष यांना लक्षावधी रुपयांचे आर्थिक साहाय्य करत होती.

१०. सोव्हिएत रशियाकडून गांधी कुटुंब, तसेच भारतीय वर्तमानपत्रांना कोट्यवधी रुपयांची लाच !

प्रसिद्ध लेखक आणि संशोधक श्री. आभास मालदहियार सांगतात, ‘‘भारतातील राजकारणात सोव्हिएत रशिया आणि केजीबी यांचा थेट हस्तक्षेप आपण पाहू शकतो. एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण संबंध म्हणजे त्या वेळी इंदिरा गांधी यांना अनुमाने २ कोटी रुपये देण्यात आले होते. ‘आर्काईव्ज’मध्ये (गुप्त कागदपत्रे) असेही सांगण्यात आले आहे की, पैसे राजीव गांधी कुटुंबाकडे वर्ग करण्यात येत होते. मग ते सोनिया गांधी यांच्याकडेही असू शकतात किंवा अन्य कुणाकडेही ! ‘आर्काईव्ज’मधील एका नोंदीनुसार असेही सांगण्यात आले आहे की, भारतातील अनुमाने १० वर्तमानपत्रांना सोव्हिएत रशियाकडून त्यांच्या प्रसारासाठी भाड्यावर ठेवण्यात आले होते.’’

११. भारतात क्रांती घडवून आणण्यासाठी साम्यवाद्यांकडून हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा कुटील प्रयत्न !

युरी बेझमेनोव्ह पुढे सांगतात की, मला धक्का तेव्हा बसला, जेव्हा मला हे समजले की, माझा देश भारतामध्ये स्वातंत्र्य, प्रगती आणि दोन राष्ट्रांमधील मैत्री या गोष्टी नाही, तर वंशवाद, शोषण, गुलामगिरी अन् अर्थात्च आर्थिक अकार्यक्षमता यांसारख्या गोष्टी आणत आहे.

प्रसिद्ध लेखक आणि संशोधक श्री. संदीप बाळकृष्ण यावर प्रकाश टाकतांना सांगतात, ‘‘मार्क्सवाद्यांचे ध्येय स्पष्ट होते. त्यांनी जाणले होते की, भारतात साम्यवादाची क्रांती साधण्याचा, म्हणजेच येथे ‘साम्यवादाचे नंदनवन’ निर्माण करण्याचा एकमेव मार्ग हा हिंदु संस्कृती, समाज आणि त्याच्या सभ्यतेचा वारसा यांचा पाया नष्ट करणे, हाच होय. ते ‘कम्युनिस्ट स्वर्ग’ स्थापन करण्याची आशा बाळगून होते, जेथे हिंदू नाहीत, मुसलमान नाहीत, तर केवळ कॉम्रेड्सच असतील. त्यामुळे त्यांनी हे करण्यासाठी सर्व माध्यमांचा वापर करून आक्रमण केले – निवडणुका, राजकीय प्रचार, पाठ्यपुस्तकांमध्ये परिवर्तन यांच्या माध्यमातून, हिंदु समाजाला प्रामुख्याने ‘जातीप्रेरित’ आणि ‘अत्याचारी’ अशा प्रकारे चित्रित करून अन् ‘हिंदु स्त्रियांचा दर्जा खालावला गेला; कारण त्या हिंदू होत्या’, असे निरर्थक अपसमज पसरवून…! त्यांनी चित्रपट, साहित्य, चित्रकला, कला, नाटक अशा सर्व माध्यमांचा वापर केला.

१२. भारतातील साम्यवादी पक्षाला सत्तेत आणण्यासाठी चालवलेले प्रयत्न !

युरी बेझमेनोव्ह पुढे सांगतात, ‘‘केजीबीतील माझ्या वरिष्ठांनी विशेषतः एक सूत्र मांडले होते – ‘डाव्यांची (साम्यवाद्यांची) कधीही चिंता करू नका !’ या राजकीय वेश्यांना (‘पोलिटिकल प्रॉस्टिट्यूट्स’ना) विसरा. उच्च ध्येय ठेवा. माझ्यासाठी ही सूचना होती की, मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या प्रस्थापित पुराणमतवादी प्रसारमाध्यमांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करा – श्रीमंत चित्रपट निर्माते, विचारवंत, तथाकथित शैक्षणिक वर्तुळे येथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा !’’

‘भारतात हिंसक आंदोलनांसारखे साम्यवादी डावपेच अयशस्वी होतील’, हे अनेक दशकांपासून भारतातील साम्यवादी पक्षाला आर्थिक साहाय्य करता करता सोव्हिएत रशियाच्या लक्षात आले होते. प्रत्यक्ष परिस्थिती अभ्यासून केजीबीने इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यातील मतभेद वाढवले अन् काँग्रेस पक्षात फूट पाडली. वर्ष १९६९ मध्ये इंदिरा गांधी यांनी स्वतःची काँग्रेस सशक्त करण्यासाठी साम्यवादी पक्षाशी युती केली. साम्यवादी पक्ष आता भारतात सत्तेत प्रवेश करू शकत होता.

(क्रमश: पुढील रविवारी)
(साभार : ‘प्राच्यम्’ हिंदु ओटीटी)

संपादकीय भूमिका : स्वातंत्र्योत्तर काळात नेहरूंनी ब्रिटिशांसह अन्य राष्ट्रांशी केलेले गुप्त करार आताच्या सरकारने देशहितार्थ खुले करणे आवश्यक !