|
कँडेलारिया (फिलिपिन्स) – फिलिपिन्समधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री अँड अकॅडेमिक रिसर्च इन्कॉर्पोरेटेड’च्या (आय्.आय्.ए.आर.आय्.) वतीने सोलापूर, महाराष्ट्र येथील ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले यांना ‘आंतरराष्ट्रीय विद्वान पुरस्कार’ (‘इंटरनॅशनल ल्युमिनरी अवॉर्ड’) प्रदान करण्यात आला. डॉ. विजय आठवले यांच्यातील उत्तम नेतृत्वकौशल्य हे सर्वांसाठी स्फूर्तीदायी आहे. त्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक प्रशासन आणि अनुकरणीय संघटनात्मक व्यवस्थापन यांद्वारे संस्थेचे यश अन् विकास साधण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. याची नोंद घेऊन डॉ. विजय आठवले यांना हा पुरस्कार देण्यात आला. १४ डिसेंबर २०२४ या दिवशी ‘आय्.आय्.ए.आर.आय्.’ने आयोजित केलेल्या चौथ्या ‘इंटरनॅशनल ल्युमिनरी ॲवार्ड्स, २०२४’च्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. विजय अनंत आठवले हे सनातनचे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊ काका) यांचे चिरंजीव आहेत.
विविध क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणार्यांना देण्यात येतो आंतरराष्ट्रीय विद्वान पुरस्कार’
हा पुरस्कार शिक्षण, संशोधन, नेतृत्व, नागरी सेवा आणि शैक्षणिक नेतृत्व यांसारख्या क्षेत्रांतील प्रेरणादायी यशोगाथांचा गौरव करतो. ज्या व्यक्तींनी त्यांचा व्यवसाय, शैक्षणिक कार्य, समाजसेवा आणि प्रेरणादायी कृती यांद्वारे त्यांच्या संस्थांसाठी किंवा समुदायांसाठी अनुकरणीय योगदान दिले आहे, अशा व्यक्तींचा सन्मान करणे, हे हा पुरस्कार देण्यामागे संस्थेचा उद्देश आहे.
फिलिपिन्समधील आय्.आय्.ए.आर.आय्. संस्थेचे कार्य
‘द इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री अँड अकॅडेमिक रिसर्च इन्कॉर्पोरेटेड’ (आय्. आय्.ए.आर.आय्.) ही फिलिपिन्सस्थित एक स्वयंसेवी संस्था आहे. संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रांत शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.