भाजपचे २ खासदार घायाळ झाल्याने रुग्णालयात भरती
नवी देहली – संसद भवन परिसरात १९ डिसेंबरला सकाळी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेत भाजपचे खासदार प्रताम सिंह सारंगी आणि मुकेश राजपूत घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः खासदार राजपूत यांना भ्रमणभाष करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खासदार सारंगी यांनी, ‘मला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केली आणि त्यामुळे मी खाली पडलो अन् माझ्या डोक्याला मार लागला’, असा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी हा आरोप फेटाळत भाजपच्या खासदारांनीच त्यांना संसद भवनाच्या मकर द्वारातून प्रवेश करण्यापासून रोखतांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे या घटनेमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यामुळे ते दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आले.
या प्रकरणी भाजपने पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात येईल, असे म्हटले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरोप केला की, भाजपच्या खासदारांनी राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांना धक्काबुकी केली.
संपादकीय भूमिका‘संसद म्हणजे कुस्तीचा आखाडा’ असे आता म्हटल्यास चुकीचे ठरू नये. असे खासदार जनतेपुढे काय आदर्श ठेवत आहेत, हे लक्षात येते ! |