|
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांची १९ डिसेंबर या दिवशी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सभागृहात याविषयी घोषणा केली. डॉ. गोर्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून देत सभागृहाचे आणि प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना सभापती पद सोडावे लागल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून विधीमंडळाचे विधान परिषदेचे सभापती पद रिक्त होते. भाजपकडून प्रा. राम शिंदे यांचे १८ डिसेंबरला विधान परिषद सभापती पदासाठी आवेदन प्रविष्ट केले होते; मात्र त्यांच्या विरोधात एकही आवेदन प्रविष्ट झाले नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रा. राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून निसटता पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषद सभापती पदासाठी संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रा. राम शिंदे हे गुरुजी (सर) आहेत. त्यामुळे वर्ग कसा चालवायचा, याची त्यांना सवय आहे. ते शिस्तीने आणि संवेदनशीलपणे सभागृह चालवतील, असा मला विश्वास आहे.
सर्वांनी उत्तरदायीपणे वर्तन राखावे ! – प्रा. राम शिंदे, सभापती
विधान परिषदेचे नूतन सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, सर्व सदस्यांनी उत्तरदायीपणे वर्तन राखावे. संसदीय लोकशाहीची व्यवस्था जनतेपर्यंत अधिकाधिक पोचावी, यासाठी प्रश्नोत्तराचा घंटा आणि त्याचे गांभीर्य सर्वांनी ओळखले पाहिजे. कोणत्याही कायदा निर्मितीत सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा, त्यामुळे महत्त्वाचे विधेयक विनाचर्चेने संमत होऊ नये, त्याष्टीने कार्यवाही केली जाईल. सभापती म्हणून निवड केल्याविषयी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.