राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक मुख्यमंत्री झाल्याचा आनंद !‘महायुती सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, याचा मला आनंद आहे. तेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत’, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. |

नागपूर – निरपेक्ष भावनेने काम कसे करावे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराकडून शिकावे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो. पुढच्या वर्षी २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत, हेसुद्धा विशेष आहे. देशाच्या सेवेत संघाचे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण जोडणारी आहे, तोडणारी नाही. रेशीमबाग येथे आल्यानंतर प्रेरणा आणि ऊर्जा मिळते अन् पुढील काम करण्यासाठी बळ मिळते. निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणार्यांनी एकदा तरी येथे अवश्य यावे आणि येथून प्रेरणा घेऊन जावी, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे येथील मुख्यालय यांविषयी बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, तसेच द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांचे येथील रेशीमबाग येथे स्मृती भवन आहे. त्याला ‘हेडगेवार स्मृती भवन’, असे म्हणतात. हे संघाचे मुख्यालय असून प्रत्येक वर्षी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत भाजप आणि त्याचे सहयोगी पक्ष यांना या ‘स्मृती भवना’ला भेट देण्यासाठी निमंत्रित केले जाते. त्या प्रथेनुसार १९ डिसेंबर या दिवशी महायुतीतील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, पंकज भोयर, चित्रा वाघ, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय, शिवेंद्रराजे भोसले, संजय राठोड, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे, नीलेश राणे, राम शिंदे, प्रवीण दरेकर, नितेश राणे, डॉ. नीलम गोर्हे, संजय उपाध्याय, उदय सामंत, गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, प्रताप सरनाईक यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे इतर आमदार उपस्थित होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते.
या वेळी संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना संघकार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हेही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘रेशीमबाग येथे मी यापूर्वीही आलो आहे. संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझे नाते लहानपणापासूनचे आहे. संघाच्या शाखेतूनच माझा प्रारंभ झाला. नंतर शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण चालू झाली. संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार समान आहेत.’’
सामान्यांना असामान्य घडवणारे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ! – डॉ. नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद

या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाल्या, ‘‘संघाने नेहमी राष्ट्रासाठी काम केले आहे. त्याचा लाभ या निवडणुकीत महायुतीला झाला. हिंदुत्वाचा विचार करणारे संघटन म्हणजे संघ आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि संघाचे विचार सारखे होते. आम्हाला इथे आल्यानंतर कुठेही वेगळ्या ठिकाणी आलो, असे जाणवत नाही. सामान्यांना असामान्य घडवणारे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाच्या कार्यक्रमाला जाणे टाळले !![]() वर्ष २०२३ मध्ये महायुती सरकारच्या काळात नागपूर झालेल्या अधिवेशनाच्या वेळी संघाच्या येथील मुख्य कार्यालयाला भेट देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले होते. त्यामुळे यावर्षी ‘उपमुख्यमंत्री पवार येतील का ?’ हा प्रश्न होता; मात्र पवार गटाचे केवळ राजू कारेमोरे वगळता अन्य कुणीही आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. |