कायद्याच्या प्रक्रिया पूर्ण करून नामांतरण होईल ! – रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय मंत्री

छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वेस्थानकासह अनेक ठिकाणी अजूनही ‘औरंगाबाद’ अशी नावे

रावसाहेब दानवे

नागपूर – राज्याने आणि केंद्राने ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे केल्यानंतर ज्या काही सरकारी प्रक्रिया आहेत, त्या पार पाडून रेल्वेस्थानके, विमानतळे किंवा अन्य कार्यालये यांचे नामांतर निश्‍चित होईल. कायद्याच्या प्रक्रिया पूर्ण करून हे नामांतर होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहर यांचे केंद्रशासनाच्या अनुमतीनंतर राज्यशासनाच्या वतीने नामांतर करण्यात आले आहे; मात्र तेथील विमानतळ, रेल्वेस्थानक यांच्यासह बर्‍याच आस्थापनांचा नामोल्लेख ‘औरंगाबाद’ असाच आहे. त्यांचे नामांतर कधी होणार ?’ असा प्रश्‍न ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी रावसाहेब दानवे यांना विचारला होता. त्या वेळी ते बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार !

‘मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याची चेतावणी दिली आहे. त्यासंदर्भात राज्यशासनाचे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी त्यांना पुन्हा भेटणार आहे का ?’ असे विचारले असता दानवे म्हणाले की, राज्य सरकार कधीही चर्चा बंद ठेवत नाही. ते उपोषण करत असतील, तर राज्य सरकारचे प्रतिनिधी त्यांना अवश्य भेटतील. त्यांचे काय म्हणणे आहे ? ते ऐकून घेतील आणि ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या करतील. त्यांचे उपोषण चालू झाल्यानंतर राज्यातील जनता कसा प्रतिसाद देणार ? आणि त्याला अनुसरून त्यांना कधी भेटायचे ? ते राज्य सरकार ठरवेल.