घोषणा देत सर्व आमदारांचा विधानभवनात प्रवेश
नागपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या भाषणात ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने नागपूर येथील संविधान चौक ते विधानभवनापर्यंत आंदोलन केले. यात महाविकास आघाडीचे आमदार सहभागी झाले होते.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून आणि अभिवादन करून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र घेऊन घोषणा देत सर्व आमदारांनी विधानभवनात प्रवेश केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधीमंडळ नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याचे आम्हाला वाटते, तसे नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील भाजपचे मित्रपक्ष यांना वाटत असेल, तर त्यांनी आंदोलन केले पाहिजे.’’
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी क्षमा मागावी.’’ राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार डॉ. नितीन राऊत म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमची अस्मिता आहे. आंबेडकर माणुसकीला मानत होते.’’