सद्गुरु बाळ महाराज यांच्यावर मुसलमानांच्या कथित धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

प.पू. सद्गुरु संतोष उपाख्य बाळ महाराज

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – १० डिसेंबरला इचलकरंजी शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदूंना संबोधित करतांना मुसलमान समाजाच्या कथित धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी योगी संतोष उपाख्य सद्गुरु बाळ महाराज यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मुबारक सलिम देसाई यांनी तक्रार दिली आहे.

हिंदूंवर अत्याचार होण्यामागील मूळ कारण लोकांसमोर मांडणे गुन्हा कसा ? – सद्गुरु बाळ महाराज

या संदर्भात योगी संतोष उपाख्य सद्गुरु बाळ महाराज म्हणाले, ‘‘आज सार्‍या जगात जिहादी आतंकवादामुळे अनेक देशांची काय स्थिती आहे ? ते आपण पहात आहोत. बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलींवर बलात्कार करून तिची हत्या केली जाते, सहस्रो हिंदूंच्या हत्या होत आहेत, मंदिरे तोडली जात आहेत, हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे हे सर्व कशाचे मूळ आहे ? ते लोकांसमोर मांडणे हा गुन्हा कसा काय ? बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळवण्यासाठी आम्हाला आज मोर्चे काढावे लागत आहेत. आता पूर्वीचा भारत राहिलेला नसून तो पालटलेला भारत आहे. त्यामुळे जगात जे घडत आहे, ते सत्य लोकांपुढे आलेच पाहिजे.

संपादकीय भूमिका

तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, काँग्रेसचे प्रियांक खर्गे हे सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच्.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची भाषा बोलत आहेत. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रात निखिल वागळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही सनातन धर्म संपवण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करून ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’, अशा प्रकारची विषारी टीका करत आहेत. यांच्यावर केवळ नाममात्र गुन्हे नोंदवले जातात आणि पुढे कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे धार्मिक भावना हिंदु सोडून अन्य धर्मियांनाच असतात, असेच नेहमी हिंदूंना वाटते !