‘सनबर्न’ गोव्यात का नको ?

गोव्यातील सनबर्न कार्यक्रम हा एक जागतिक स्तरावर प्रसिद्ध ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (इ.डी.एम्.) फेस्टिव्हल’ आहे, जो प्रत्येक वर्षी गोव्यात आयोजित केला जातो. याचे आयोजन सहसा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि गोव्याच्या पर्यटन उ‌द्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केले जाते. तथापि या कार्यक्रमाच्या आयोजनावर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत. गोव्यातील लोक आणि सरकार यांचे मत २ गटांत विभाजित झाले आहे. एक गट या कार्यक्रमाच्या आयोजनाला समर्थन देतो, तर दुसरा गट त्याच्या विरोधात आहे आणि त्यासाठी अनेक कारणेही आहेत. 

१. अमली पदार्थांचा वापर आणि युवकांना धोका

सनबर्न कार्यक्रमाला ‘ड्रग्स फ्री इव्हेंट’, (अमली पदार्थ मुक्त कार्यक्रम) असे म्हटले जात असले, तरी पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांचे अनुभव हे दाखवून देतात की, या कार्यक्रमामध्ये अमली पदार्थांचा मुक्तपणे वापर होतो. वर्ष २००९ मध्ये कांदोळी येथील सनबर्न कार्यक्रमात नेहा बहुगुणा हिचा मृत्यू अमली पदार्थाच्या अतीसेवनामुळे झाला. त्याचप्रमाणे वर्ष २०१३ मध्ये अमली पदार्थांचा दलाल (ड्रग डीलर) सौरभ अग्रवालला अटक केली गेली होती आणि त्याच्याकडून ‘केटामिन’ या ‘डेट रेप ड्रग्ज’च्या ४५० बाटल्या जप्त झाल्या होत्या. या कार्यक्रमांमध्ये होणार्‍या अमली पदार्थांच्या सेवनामुळे अनेक युवकांच्या जीवितांना धोका निर्माण होतो.

२. सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम

गोव्यातील लोकसंस्कृती आणि पारंपरिक कार्यक्रम यांवर ‘सनबर्न’चा परिणाम होतो. गोव्याचे संगीत, नृत्य आणि विविध पारंपरिक कलेचे कार्यक्रम हे गोव्यातील खर्‍या संस्कृतीचा भाग आहेत. असे असतांना गोव्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला यांना प्रोत्साहन देण्याऐवजी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अमली पदार्थांचा वापर अन् ‘इलेक्ट्रॉनिक म्युझिक’ कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाते. हे गोव्यातील स्वदेशी संस्कृतीसाठी धोकादायक ठरते.

श्री. गोविंद चोडणकर

३. अवैध व्यवसाय आणि माफियांचे वर्चस्व

गोव्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. काही ठिकाणी विशेषतः गोव्यातील किनारी भागांत अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय उघडपणे चालवला जातो. वर्ष २०१९ मध्ये वागातोर येथे झालेल्या ‘सनबर्न क्लासिक’ या कार्यक्रमात ३ युवकांचा मृत्यू अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे झाला. या प्रकारचे घटनाक्रम हे अत्यंत धोकादायक आणि समाजाच्या एकतेला धक्का पोचवणारे आहेत.

४. राजकीय आणि सामाजिक गोंधळ

‘सरकारला गोव्यातील पर्यटन उ‌द्योग वाढवण्यासाठी ‘सनबर्न’ची आवश्यकता आहे’, असे म्हटले जाते; पण या ‘सनबर्न’मुळे राज्याच्या पर्यटनाला लाभ कसा होतो ? यावर सरकारने स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. ‘सनबर्न’चे आयोजन अनेकदा स्थानिक लोकांच्या इच्छेच्या विरोधात होते. धारगळमध्ये या कार्यक्रमाच्या विरोधात स्थानिक ग्रामसभेने ठराव संमत केला होता. हा कार्यक्रम विविध स्थानिक गटांमध्ये फूट पाडत आहे.

५. पर्यटनाचे पर्यायी मार्ग

गोव्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जागा घेऊन एक संस्कृतीसंपन्न अनुभव देणारे अन्य पर्यायी कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. गोव्यातील समुद्रकिनारे, योग आणि आयुर्वेदिक उपचार, तसेच सांस्कृतिक नृत्य अन् संगीत महोत्सव हे गोव्यातील पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरू शकतात. भारतीय सांस्कृतिक वारशाचा आदर करत, गोव्यात असा कार्यक्रम आयोजित केल्याने पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होईल आणि गोव्यातील लोकसंस्कृतीला जगभरात पोचवता येईल. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार वाराणसीमध्ये वर्ष २०२३ मध्ये ८ कोटी ५० लाख पर्यटक आले, तर प्रयागराजमध्ये ४ कोटी ५० लाख पर्यटक आले आणि अयोध्येच्या श्रीराममंदिराने फेब्रुवारी २०२४ मध्ये अभिषेक झाल्यापासून १ कोटी ५० लाख यात्रेकरूंना आकर्षित केले. यामुळे वाराणसी हे गोवा, आगरा आणि शिमला यांसारख्या प्रस्थापित पर्यटन केंद्रांना मागे टाकण्याची शक्यता आहे. याचा अर्थ आध्यात्मिक पर्यटनाला चालना दिल्यास गोवा जागतिक स्तरावर ‘चांगले पर्यटन केंद्र’ बनू शकते.

६. निसर्ग आणि पर्यावरण यांची हानी

‘सनबर्न’च्या आयोजनामुळे गोव्यातील पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही नाकारता येत नाहीत. या कार्यक्रमाच्या वेळी कचरा व्यवस्थापन, ध्वनीप्रदूषण आणि जंगली प्राण्यांची हानी होणे, या घटनाही घडतात. यामुळे पर्यावरणावर होणारे नकारात्मक परिणामही गोव्यातील सुंदरता आणि नैतिकता न्यून करतात.

सनबर्न कार्यक्रम हा एक व्यापारी दृष्टीकोनातून लाभ देणारा ठरू शकतो; पण त्याचे समाज आणि संस्कृती यांवर होणारे नकारात्मक परिणाम अधिक आहेत. अमली पदार्थांचा वापर, स्थानिक लोकांचा विरोध आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम हे सर्व ‘सनबर्न’च्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह उभे करतात. त्यामुळे गोव्यात अशा कार्यक्रमांच्या आयोजनाऐवजी गोव्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे अधिक योग्य ठरेल. (१२.१२.२०२४)

– श्री. गोविंद चोडणकर, उत्तर गोवा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.

संपादकीय भूमिका :

युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या‘सनबर्न’ऐवजी गोव्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे अधिक योग्य !