विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड असेल ! – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर – अडीच वर्षे महाराष्ट्राच्या कायापालटाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतांनाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,…

१. विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातील ५ लाख शेतकर्‍यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी १५ सहस्र रुपये वरून २० सहस्र रुपये वाढ केली आहे. विदर्भ ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून विकसित करायचा आहे.

२. विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० सहस्र कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे.

३. परदेशी गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, जी.एस्.टी.त वसुली, पाच लाखांचा आरोग्य विमा देणे, शेतकर्‍यांना मोफत वीज देणे, १० लाख तरुणांना विद्यावेतन देणे, ही कामे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

४. महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे चालू आहेत.

५. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पुरवणी मागण्यात १ सहस्र ४०० कोटी रुपयांचे प्रावधान केले. लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत.

६. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’त ९ शहरांतून तीर्थयात्रा चालू झाली आहे. त्याचा ६ सहस्रांहून अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. एस्.टी.मध्ये ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास आहे.