शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘एक्स’ खाती बंद करण्याचा केंद्र सरकारचा आदेश !

  • ‘एक्स’कडून बंदीची कारवाई ; परंतु आदेशास असहमती !

  • आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करतो ! – एक्स

नवी देहली – पंजाब आणि हरियाणा येथील कथित शेतकर्‍यांकडून आंदोलन करण्यात येत असून ते राजधानी देहलीत येऊन आंदोलन करण्याच्या सिद्धतेत आहेत. अशातच या आंदोलनाची माहिती देणारी ‘एक्स’वरील खाती बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने ‘एक्स’ आस्थापनाला दिला. शासकीय आदेश असल्यामुळे ‘एक्स’ने संबंधित खाती आणि पोस्ट नाईलाजास्तव हटविल्या आहेत, असा खुलासा ‘एक्स’कडून करण्यात आला आहे.

‘एक्स’च्या अधिकार्‍यांनी म्हटले की, आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरास्कर करतो. या पोस्ट कायदेशीर दंडास पात्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई होत आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करतांना आम्ही केवळ भारतासाठीच या पोस्ट दाखवण्यावर बंधन आणले आहे.

पारदर्शकतेसाठी हे आदेश सार्वजनिक करावेत ! – एक्स

माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ‘एक्स’च्या या निवेदनाचा अभ्यास करत असून लवकरच त्याला उत्तर दिले जाणार आहे. ‘एक्स’ने पुढे म्हटले की, भारत सरकारच्या आदेशाच्या विरोधात आम्ही एक याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. कायदेशीर बांधीलकी असल्यामुळे आम्ही शासकीय आदेश सार्वजनिक करू शकत नाही; पण आमचे म्हणणे आहे की, पारदर्शकतेसाठी हा आदेश सार्वजनिक करावा. जर हा आदेश सार्वजनिक केला नाही, तर त्यात दायित्वाचा अभाव असल्याचा संशय येऊ शकतो.