संपादकीय : बंगाल वाचवा !

बंगालविषयी केंद्र सरकार अद्यापही काही ठोस पावले उचलतांना दिसत नसेल, तर देशभरातील हिंदूंनी आता जागृत होऊन बंगालला वाचवण्यासाठी देशभर सामाजिक माध्यमांसह इतर काही माध्यमांद्वारे जनजागृती करून सरकारला त्याविषयी पुन्हा पुन्हा सांगितले पाहिजे. दुर्दैवाने अशी वेळ आली आहे, अन्यथा काही मासांनी काश्मीरप्रमाणे बंगालमधील निर्वासित हिंदूही उर्वरित भारतियांना म्हणतील, ‘‘बंगाली हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त होत असतांना संपूर्ण भारत केवळ पहात राहिला !’’ ‘सारे काही ममता यांच्या हातात आहे’, ‘सर्व राज्याच्या अखत्यारीत आहे’, असे म्हणून तेथील हिंदूंच्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणे किंवा तेथील हिंदूंना मरण्यासाठी किंवा मरणासन्न जिणे जगण्यासाठी सोडून देणे, हे विकासाची इच्छा बाळगणार्‍या भारताला शोभणारे नाही; कारण एवढी पराकोटीची असंवेदनशीलता ही आपली संस्कृती नाही. ‘कितीही विकास केला, तरी तो विकास उपभोगण्यासाठी हिंदु जनताच शिल्लक राहिली नाही, तर त्या विकासाचे करायचे तरी काय ?’, असे अत्यंत खेदाने म्हणण्याची वेळ बंगालची स्थिती पहाता आली आहे. पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंप्रमाणेच तेथील हिंदूंची संख्याही अल्प होत आहे; कारण त्याच पद्धतीचे अत्याचार तेथील हिंदूंवर होत आहेत.

प्रसारमाध्यमे अद्याप गप्प का ?

थोडीथोडकी नव्हे, तर गेली ४० वर्षे संदेशखाली भागामध्ये तेथील साम्यवादी आणि नंतर तृणमूल काँग्रेस यांच्या नेत्यांकडून सांगूही शकत नाही, इतके लाजिरवाणे अत्याचार होत आहेत. आता ते पुन्हा एकदा बाहेर आले आहेत. याविरोधात एखाददुसर्‍या वृत्तवाहिनीचा अपवाद वगळला, तर अद्यापही ना प्रसारमाध्यमे बोलत आहेत, ना सामाजिक माध्यमे ! बंगाली भाषेमुळे कदाचित् तेथील हिंदु महिलांचे दुःखद शब्द उर्वरित भारताला लक्षात येत नाहीत, असे गृहीत धरले, तरी संदेशखालीचे प्रकरण बाहेर येऊन आता आठवडा होत आला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेतली, तरी अजूनही ज्या प्रमाणात त्याविषयी प्रसारमाध्यमांतून चर्चा होणे आवश्यक आहे, ती झालेली नाही. काश्मीरमधील वंशविच्छेदाच्या वेळी भारतात एवढे भ्रमणभाष नव्हते, सामाजिक माध्यमे नव्हती, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काँग्र्रेसचे सरकार होते आणि हिंदूही जागरूक नव्हते. आता सर्व काही पालटलेले आहे. असे असूनही आणि सर्व काही यंत्रणा हाताशी असूनही तेथील पीडित हिंदूंचा आवाज जगापर्यंत पोचवता येत नसेल, त्याविरोधात काही करता येत नसेल, तर प्रतिदिन ‘ब्रेकिंग न्यूज’चा सतत डंका पिटणार्‍या प्रसारमाध्यमांचा धिक्कार आहे ! एक एक विषय अनेक दिवस चालवणार्‍या प्रसारमाध्यमांची बंगालच्या संदर्भात मात्र अळीमिळी गुपचिळी का झाली आहे ? सर्व प्रसारमाध्यमांनी ठरवून याविषयी आवाज उठवला, तर तेथील हिंदूंना थोडेतरी साहाय्य होईल.

केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी का ?

बंगालमधील संदेशखालीमध्ये ‘तुमच्या घरातील तरुण मुली आणि सुंदर सुना यांवर आमचा अधिकार आहे’, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यांना सांगितलेल्या रात्री पक्षाच्या कचेरीत जावे लागते. अनेक वर्षे तेथील हिंदु महिला हे भोगत असणे, हे मन विदिर्ण करणारे आहे. संघ, भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या, ही तेथे सामान्य गोष्ट झाली आहे. सर्वसामान्यच नव्हे, तर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचेही शोषण तिथे झाले आहे. सर्व यंत्रणा हाताशी असूनही यावर काहीच ठोस उपाय निघत नसेल, तर ‘निवडणुकीच्या प्रसारासाठी ममता करत असलेल्या अत्याचारांची सूत्रे मिळावीत’; म्हणून केवळ याविषयी बोलून येथील हिंदूंकडे दुर्लक्ष केले जात आहे का ? हे हिंदू भाजपला मते तरी कशी देणार ? कारण ते तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान आतंकी गुंडांच्या एवढ्या प्रचंड दहशतीखाली आहेत की, ते भाजपला उघडपणे मतेही देऊ शकत नाहीत. वर्ष २०१९ मध्ये जेव्हा येथील लोकांनी भाजपला मते दिली, तेव्हा अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांच्या हत्या करण्यात आल्या. कुणाच्या डोळ्यांत गोळ्या घातल्या, तर कित्येकांची प्रेते झाडाला लटकवून ठेवली. अशा लोकांना नैराश्याविना हातात काहीच येऊ शकत नाही. त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास कधीच उडाला असेल. उद्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० हून अधिक जागा जिंकेलही; परंतु बंगालमधील माता-भगिनींची सुरक्षा आणि तेथील हिंदूंची सुरक्षा यांविषयी ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर त्यांच्या दृष्टीने निष्क्रीय तृणमूल काँग्रेस आणि कृती न करून अत्याचाराला मूकसंमती देणारा भाजप हे दोन्ही पक्ष एकसारखेच नसतील का ? त्यामुळे तेथील हिंदूंच्या जीवनात सुरक्षा, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी भाजपने त्याचा त्यांना आधार वाटेल, अशी कृती केली पाहिजे. ‘शहाजहानवरील कारवाईच्या वेळी ईडीच्या अधिकार्‍यांना मारले गेले, तर प्रसंगी त्याला अन्य दलांतील सैनिक पाठवून अटक का केली नाही ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

बंगालमधील हिंदूंना साहाय्य हवे आहे !

तेथील काही पत्रकारांनी साहस करून हे अत्याचार उर्वरित भारतात पोचवण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांना सर्वप्रकारचा पाठिंबा देणे, वैचारिक पाठिंबा देऊन त्यांचे मनोबल वाढवणे हे अन्य प्रसारमाध्यमे आणि हिंदू यांचे कर्तव्य आहे अन् त्यांना सुरक्षा देणे, हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. आज तेथील महिला आणि पत्रकार यांविषयी बोलले नसते, तर कदाचित् हे देशाला कळलेही नसते. तेथील हिंदू अन्यायाच्या विरोधात सतत आवाज उठवत आहेत. ते गप्प नाहीत; परंतु हिंदू जेव्हा जेव्हा संघटित होतात आणि अन्यायाच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा काही काळाने थेट त्यांच्या हत्या झाल्याचेच समोर येते. ‘हिंदु सांगाती’सारख्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या संदर्भातही तेच झाले आहे. संघ आणि भाजप यांच्या संदर्भातही तेच झाले आहे. सध्या संदेशखाली येथे असलेला शेख शहाजहान हा गेल्या अनेक वर्षांपासून तेथील क्रूरकर्मा आहे. त्यापूर्वी ‘मुसलमान शेख’ हा क्रूरकर्मा होता आणि त्यापूर्वी ‘ईशा लष्कर’ हा होता. या सर्वांनी हिंदूंवर शब्दांतही सांगू शकत नाही, एवढे अत्याचार केले. त्यांची भूमी, स्त्रिया, पैसा त्यांनी बळकावले, तसेच पूजेसारखे धार्मिक अधिकारही हिरावले. साम्यवादी पक्ष, बुद्धदेव भट्टाचार्य आणि ममता सरकार या सर्वांच्या कारकीर्दीत या क्रूर आतंकी गुंडांना राजाश्रय मिळाला आहे. ममता ‘येथे काय चालले आहे ?’, याकडे ढुंकूनही पहात नाहीत. एक स्त्री असूनही त्यांना येथील महिलांवरील अत्याचारांविषयी काही वाटत नाही, तसेच देशभरातील महिला संघटनांचेही बंगालच्या मुली-महिला यांच्याविषयी ममत्व जागृत होत नाही. एक हिंदु म्हणून आपण सर्वांनी आता बंगालमधील आपल्या हिंदु बांधवांवरील अन्यायाविषयीची चर्चा वाढवून त्याविषयी समाजमाध्यमांतून एक चळवळ उभारणे आवश्यक आहे. त्याचा आवाज एवढा मोठा झाला पाहिजे की, तेथील हिंदूंना बळ मिळाले पाहिजे. एक देशभक्त म्हणून आपण आता बंगालसाठी काही केले नाही, तर येत्या काळात आपण स्वतःला एक हिंदु म्हणून क्षमा करू शकणार नाही !

हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !