२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिरात श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम दूरदर्शन वाहिनीवरून थेट प्रक्षेपित झाला. हा दिव्य सोहळा पहात असतांना देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
१. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या समवेत दास्यभावातील हनुमान प्रभु श्रीरामाच्या दर्शनासाठी येत असल्याचे जाणवणे
जेव्हा भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आले, तेव्हा ‘त्यांच्या समवेत दास्यभावातील हनुमान प्रभु श्रीरामाला भेटण्यासाठी आतुरतेने येत आहे’, असे मला जाणवले. त्या दिवशी श्री. मोदीजी नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी आणि सात्त्विक दिसत होते.
२. मोदीजींनी ५ मंडप पार करून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला, तेव्हा देहरूपी पंचकोषांना पार करून हनुमानाने आत्मारामाचे दर्शन घेतल्याचे जाणवणे
जेव्हा मोदीजींनी ५ मंडप पार करून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या समवेत आलेल्या हनुमानाने देहरूपी मंदिराच्या मंडपरूपी पाच कोषांना पार केले. हे कोष होते – अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोष आणि आनंदमयकोष !
त्यानंतर जेव्हा मोदीजी गर्भगृहात पोचले, तेव्हा त्यांच्या समवेत आलेल्या हनुमानाने गर्भगृहात प्रवेश करून अंतःकरणातील प्रभु श्रीरामरूपी आत्मारामाचे दर्शन घेतल्याचे जाणवले.
३. स्थुलातून केलेल्या शंखनादाचा सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
त्यानंतर शंखनाद झाला. हा शंख सामान्य शंख नसून तो श्रीविष्णूच्या करकमलातील पांचजन्य शंख असल्याचे जाणवले. त्यामुळे या शंखनादाचा निनाद ऐकत असतांना ‘भूदेवी देवलोकातील देवतांना पृथ्वीवर प्रभु श्रीरामासह अवतरित होण्यासाठी आर्ततेने प्रार्थना करत आहे’, असे जाणवत होते. त्यामुळे या शंखनादाचा सूक्ष्म ध्वनी देवलोकापर्यंत पोचून देवतांच्या तत्त्वलहरींना पृथ्वीकडे आकृष्ट करत होता. यावरून शंखनादाचे आध्यात्मिक वैशिष्ट्य लक्षात आले.
४. आचमनाच्या वेळी दास्यभावातील हनुमानाने प्रभु श्रीरामांचे चरणतीर्थ ग्रहण केल्याचे जाणवणे
प्राणप्रतिष्ठेच्या विधींच्या अंतर्गत जेव्हा श्री. मोदीजी आचमन करत होते, तेव्हा त्यांच्या समवेत सूक्ष्म रूपाने उपस्थित असणारा हनुमान सूक्ष्मातून उपस्थित श्रीरामाचे चरणतीर्थ ग्रहण करत असल्याचे जाणवले. हे दृश्य पहात असतांना माझा प्रभु श्रीरामाप्रतीचा भक्तीभाव जागृत होऊन माझ्या नेत्रांतून भावाश्रू ओघळले.
५. शिवाने श्रीविष्णूचे आवाहन केल्यावर वैकुंठातील शेषशायी विष्णूच्या हृदयातून निळसर रंगाची एक दिव्य ज्योत प्रगट होणे आणि ती पृथ्वीच्या दिशेने येऊन श्री रामललाच्या मूर्तीमध्ये विलीन होणे
श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चालू असतांना कैलासावर वास करणारे शिव श्री रामललाच्या मंदिरात सूक्ष्मातून आले आणि त्यांनी श्रीविष्णूचे आवाहन केले. त्यानंतर वैकुंठातील शेषशायी विष्णूच्या हृदयातून निळसर रंगाची एक दिव्य ज्योत प्रगट झाली आणि ती पृथ्वीच्या दिशेने वेगाने येऊन श्री रामललाच्या मूर्तीमध्ये विलीन झाली. अशा प्रकारे श्री रामललाच्या मूर्तीमध्ये श्रीविष्णूची चैतन्यरूपी प्राणज्योत प्रज्वलित होऊन खर्या अर्थाने श्री रामललाच्या मूर्तीमध्ये सूक्ष्मातून प्राणांची प्रतिस्थापना झाली. तेव्हा श्री रामललाच्या मूर्तीतील हृदयाचे ठोके सूक्ष्मातून चालू झाल्याचे मला जाणवले.
६. शिवाने दिलेल्या आदेशावरून वायुदेवाने पंचप्राणांचे पाच प्रवाह श्री रामललाच्या मूर्तीमध्ये प्रवाहित करणे
जेव्हा पुरोहितांनी श्री रामललाच्या मूर्तीमध्ये पंचप्राणांचे आवाहन केले, तेव्हा श्री. मोदीजींच्या शेजारी मला सूक्ष्मातून शिवाचे दर्शन झाले. शिवाने वायुदेवतेला ‘प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान’, या पंचप्राणांना मूर्तीमध्ये प्रवाहित करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे वायुदेवाने पंचप्राणांचे पाच प्रवाह श्री रामललाच्या मूर्तीमध्ये प्रवाहित केले. हे प्रवाह मूर्तीमधील प्राणज्योतीशी एकरूप झाल्यामुळे मूर्तीमध्ये जिवंतपणा आला आणि मला मूर्ती सूक्ष्मातून सजीव झाल्याचे जाणवले. तेव्हा मला मूर्तीतील श्री रामललाचा सूक्ष्मातून श्वासोच्छ्वास चालू झाल्याचे जाणवले.
७. विविध देवतांनी सूक्ष्मातून पुष्पवृष्टी केल्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय होणे
श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी चालू असतांना जेव्हा स्थुलातून हेलीकॉप्टरने श्री रामललाच्या मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तेव्हा सूक्ष्मातून ब्रह्मांडातील समस्त देवदेवतांनी श्री रामललाच्या मंदिरावर दिव्य फुलांची वृष्टी केली. या दिव्य फुलांचा दैवी गंध पृथ्वीच्या वायूमंडलात पसरल्याने संपूर्ण वायूमंडल सुगंधित झाले. त्यामुळे हा सोहळा पहाणार्या रामभक्तांचा
श्री रामललाप्रती असणारा भाव जागृत होऊन त्यांची मने श्रीरामाच्या भक्तीने पुलकित झाली. पुष्पांतून व्यक्त होणार्या भावमय गंधलहरींमुळे श्री रामललाच्या मूर्तीतील मारक तत्त्व न्यून होऊन तिच्यातील तारक तत्त्व वाढल्याचे जाणवले. त्यामुळे श्री रामललाच्या मूर्तीतून संपूर्ण वायूमंडलात आनंदाची वलये प्रक्षेपित होऊन संपूर्ण वातावरण राममय झाले.
८. यक्ष, गंधर्व आणि किन्नर यांनी विविध कलांचे प्रस्तुतीकरण करून आनंद व्यक्त करणे
प्राणप्रतिष्ठा विधी चालू असतांना पृथ्वीच्या आकाशमंडलात यक्षांनी प्रभु श्रीरामाच्या चरित्रातील विविध प्रसंगांचे वर्णन करणार्या विविध मुद्रा आणि भाव प्रगट करून अभिनयाच्या माध्यमातून उत्कृष्ट नाट्यकला सादर केली. तसेच गंधर्वांनी सुमधुर स्वरामध्ये गायन केले आणि किन्नर अन् अप्सरा यांनी दैवी नृत्य सादर करत आनंद व्यक्त केला.
९. देवर्षि नारद आणि तुंबरू यांनी भगवंताचे स्तुतीगान करणे
त्यानंतर देवर्षि नारद आणि तुंबरू यांनी त्यांच्याकडे असणार्या विणेचे सुमधुर वादन करून श्रीविष्णूचे स्तुतीपर श्लोक म्हटले अन् प्रभु श्रीरामाच्या बालरूपाच्या लीला आणि महिमा यांचे कीर्तन केले. त्यामुळे आकाशमंडलात जमलेले समस्त पुण्यात्मे, धर्मात्मे आणि दिव्यात्मे यांची मने राममय होऊन त्यांची भावजागृती झाली. त्यांच्या डोळ्यांतून सूक्ष्मातून वहाणार्या भावाश्रूंचे रूपांतर सुंदर आणि कोमल असणार्या पारिजातक, मोगरा आणि कमळ या फुलांमध्ये होऊन ही फुले पृथ्वीवरील श्री रामलालाच्या मूर्तीच्या चरणांवर वाहिली गेली. तेव्हा स्थुलातून श्री. मोदीजींनी श्री रामललाच्या चरणांवर गुलाबी रंगाचे मोठे कमळ अर्पण केले. अशा प्रकारे ‘कोणत्याही लोकात रहाणार्या भक्ताचा भाव भगवंतापर्यंत निश्चितपणे पोचतो’, याची ग्वाही मिळाली.
१०. पृथ्वीवर होणारा श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा दिव्य सोहळा पहाण्यासाठी धर्मलोकातून दिवंगत कारसेवकांचे धर्मात्मे पृथ्वीच्या आकाशमंडलात जमल्याचे जाणवणे
१९९०-९२ या वर्षी अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना होण्यासाठी ज्या कारसेवकांनी आंदोलन करून प्राणार्पण केले होते, त्यांना मृत्यूत्तर धर्मलोकात (उच्च स्वर्गलोक आणि महर्लाेक यांच्या मध्ये) स्थान मिळाले होते. २२.१.२०२४ या दिवशी पृथ्वीवरील
श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा हा दिव्य सोहळा पहाण्यासाठी धर्मलोकातून दिवंगत कारसेवकांचे धर्मात्मे पृथ्वीच्या आकाशमंडलात जमले होते. मला सूक्ष्मातून त्यांच्या ठिकाणी भगव्या रंगाची धर्मज्योत प्रज्वलित असल्याचे दिसले. ते एका स्वरात ‘जय श्रीराम ।’ आणि ‘जय हनुमान ।’ असा जयघोष करत होते. त्यामुळे पृथ्वीचे आकाशमंडल या जयजयकाराने दुमदुमले होते.
११. देवांचा शिल्पकार विश्वकर्मा यांच्या कृपेने अयोध्येत श्री रामललाची एक अत्यंत दिव्य मूर्ती आणि चैतन्यदायी मंदिर साकार झालेले असणे
देवांचा शिल्पकार विश्वकर्मा याने सूक्ष्मातून केलेल्या मार्गदर्शनामुळे श्री. अरुण योगीराज यांनी श्री रामललाची मूर्ती अत्यंत भक्तीभावाने बनवलेली आहे. तसेच देवांचा शिल्पकार विश्वकर्मा यांनी वास्तुशिल्पींना सूक्ष्मातून दिलेल्या प्रेरणेमुळे श्रीरामाचे मंदिर बांधणार्या वास्तुशिल्पींनी अत्यंत कौशल्याने मंदिराचे कोरीवकाम केले आहे. त्यामुळे श्री रामललाच्या मंदिराला दिव्यत्व प्राप्त झाले असून तेथील गर्भगृहात श्री रामललाच्या रूपाने प्रभु श्रीराम आणि विविध रामभक्त यांच्या मूर्तींच्या रूपाने विविध देवतांची तत्त्वे कार्यरत झाली आहेत. त्यामुळे अयोध्येत श्री रामललाचे एक अत्यंत दिव्य आणि चैतन्यदायी मंदिर साकार झाले आहे.
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२४)
|