हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेले हिंदु !
१. फ्रान्समधील मौलिक ग्रंथालय जाळण्याच्या कृतीतून इस्लामी धर्मांधांच्या क्रूरतेत भेद न आढळणे
‘औरंगजेबासारख्या क्रूर आणि धर्मांध शासकाला सहिष्णुतेचे अन् धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड जुलै २०२३ मध्ये फ्रान्समध्ये भयंकर दंगल घडवून आणणार्या मुसलमानांची मात्र बाजू घेऊन मुंब्र्यामध्ये फ्रान्सच्या विरोधात प्रदर्शन आयोजित करतात. २७ जून २०२३ या दिवशी फ्रान्समध्ये नाहेल नावाच्या मुसलमान युवकाने लाल सिग्नल असतांनाही त्याची गाडी पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांनी पुढचे अनर्थ टाळण्यासाठी त्या युवकाला रोखण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण पोलिसांना न जुमानता नाहेलने त्याची गाडी नियम मोडून पुढे दामटलीच. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात तो ठार झाला आणि मग फ्रान्समध्ये धर्मांध मुसलमानांनी रस्त्यावर उतरून प्रचंड हिंसा अन् जाळपोळ चालू केली. २०० पोलीस कर्मचारी घायाळ झाले. पॅरिसमध्ये २०० वर्षांपूर्वीचे आणि मौलिक ग्रंथसपदा असणारे वाचनालय जाळले. यावरून मला वर्ष ११९३ मध्ये बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापिठातील ग्रंथालय जाळण्याच्या प्रसंगाची आठवण झाली. सहस्रो वर्षे झाली, तरी मुसलमानांच्या विध्वंसक वृत्तीमध्ये कोणताही फरक पडला नाही, हेच फ्रान्समधील घटनेवरून परत एकदा दिसून आले. भारतात हिंदूवर अत्याचार होतात, हिंदु साधू-संतांना ठेचून ठेचून मारले जाते, तेव्हा मात्र जितेंद्र आव्हाडांसारखे तथाकथित धर्मनिरपेक्षवादी रस्त्यावर उतरून कधीच निषेध करत नाहीत; पण फ्रान्समधील दंगलखोर मुसलमानांचा मात्र त्यांना पुळका येतो. असे लोक जन्माने हिंदु असले, तरी मात्र हिंदूंसाठी सर्वांत अधिक घातक असतात.
२. इस्लामी अन्यायी प्रथांविरोधात नव्हे, तर हिंदूंच्या संस्कृतीविषयी जाब विचारल्यावर काहूर माजवणारे हिंदुद्वेष्टे !
हिंदु धर्म आणि संस्कृती यांमधील वैज्ञानिक रितीरिवाजही हिंदु म्हणून अपघाताने जन्मलेल्या या हिंदुद्वेष्ट्यांना मान्य नसतात. मुसलमान मुली आणि महिला यांनी बुरखा अन् हिजाब घालणे हे या हिंदुद्वेष्ट्यांना मान्य असते. ‘मुसलमान स्त्रियांनी सतत बुरखा आणि हिजाब घातलाच पाहिजे’, ही इस्लाम धर्मातील रूढी मुसलमान स्त्रियांवर अन्याय करणारी आहे. विविध शारीरिक रोगांना आमंत्रण देणारी ही प्रथा, परंपरा आहे. हिंदुद्वेष्टे याविरुद्ध तोंडातून ‘ब्र’ काढत नाहीत; पण एखाद्या ज्येष्ठ हिंदूने हिंदु मुलीला ‘तू कपाळावर कुंकू का लावत नाहीस ?’, असे नुसते विचारले, तरी त्या व्यक्तीवर हे हिंदुद्वेष्टे तुटून पडतात.
३. कुंकवाचे आध्यात्मिक, सामाजिक, शारीरिक आणि वैज्ञानिक महत्त्व हिंदुद्वेष्टे समजून घेणार का ?
कुणा मुलीने टिकली किंवा स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावण्याची हिंदु धर्माने कधीही सक्ती केली नाही; कारण या धर्मात व्यक्तीगत स्वातंत्र्य पुष्कळ आहे. टिकली, कुंकू लावणे अथवा न लावणे, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक हिंदु स्त्रीला आहे; पण प्रत्येक हिंदु मुलीने आणि स्त्रीने स्वतःच्या कपाळावर टिकली किंवा कुंकू लावावे, ही प्रत्येक हिंदूची अपेक्षा असते. कुंकू हे तर हिंदूंमध्ये स्त्रियांच्या सौभाग्याचे लक्षण आहे. याखेरीज प्रथम मेण आणि त्यावर हळद या औषधीयुक्त कंदापासून बनवलेले कुंकू लावणे याचा संबंध स्त्रियांच्या स्वास्थ्याशीही आहे. हिंदु धर्म आणि संस्कृती यांमधील रितीरिवाज वैज्ञानिक आहेत, ते सभ्यता आणि नीतीमत्ता यांच्याशी संबंधित आहेत, हे हिंदुद्वेष्ट्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. कपाळावरील कुंकवाने स्त्रियांच्या चेहर्याची शोभा तर वाढतेच; पण समाजाचा अशा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराचाच असतो, हेही वास्तव टीकाकारांनी लक्षात घेतले पाहिजे.
४. शिवछत्रपती आणि देशभक्ती यांचे धगधगते अग्नीकुंड म्हणजे पू. संभाजी भिडेगुरुजी !
कुंकवाविषयी हे सर्व सांगण्याचे कारण, म्हणजे आदरणीय पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविषयी काही मासांपूर्वी घडलेला एक प्रसंग. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदु संघटनेचे संस्थापक असणारे पू. संभाजी भिडेगुरुजी हे महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तीमत्त्व ! पू. भिडेगुरुजी जेवढे उच्चविद्याविभूषित, तेवढेच जाज्वल्य हिंदुत्वनिष्ठ आहेत. संसाराचा, स्वतःचा नावाने असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या संपत्तीचा त्याग करून हा निस्पृह माणूस, अनवाणी पायाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गडदुर्ग पालथे घालत असतो. गडावरच्या प्रत्येक कानाकोपर्याचे दर्शन घेत असतो आणि छत्रपती शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास समवेत आलेल्या तरुण धारकर्यांच्या मनावर बिंबवत असतो ! अंगावर एक साधे धोतर आणि कुडता अन् मनात छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज, हिंदु धर्म, देव आणि देश यांच्याविषयीच्या निष्ठा अन् अपार प्रेम, अभिमान बाळगणारे पू. संभाजी भिडेगुरुजी, म्हणजे शिवछत्रपती आणि देशभक्ती यांचे धगधगते एक अग्निकुंडच आहेत ! अशा शिव आणि देश भक्तीने भारित अन् प्रेरित झालेले लाखो तरुण धारकरी पू. भिडेगुरुजींच्या शिवप्रतिष्ठानशी जोडलेले आहेत.
५. असे हिंदुद्वेष्टे इस्लाममधील स्त्रियांविषयीच्या अन्यायकारक प्रथांविषयी काही बोलतील का ?
कट्टर हिंदुत्वनिष्ठ पू. भिडेगुरुजी यांच्याविषयी हिंदुद्वेष्ट्यांच्या मनात मात्र राग आहे. ते पू. भिडेगुरुजी यांच्या प्रत्येक विधानाचा चुकीचा अर्थ काढून त्यांच्यावर टीका करत असतात. हे सर्व टीकाकार पू. भिडेगुरुजी यांच्या तुलनेत अगदी क्षुद्र असतात. त्यांची पू. भिडेगुरुजीच्या पायाशीही उभे रहाण्याची पात्रता नसते. काही दिवसांपूर्वी हे पू. भिडेगुरुजी राज्याच्या मंत्रालयात काही कामासाठी गेले होते. पू. भिडेगुरुजी मंत्रालयातून बाहेर पडताच एका वाहिनीची महिला पत्रकार समोर आली आणि तिने पू. भिडेगुरुजींना प्रश्न विचारला. त्या महिला पत्रकाराच्या कपाळावर कुंकू अथवा टिकली ही नव्हती. तिच्या भोंड्या कपाळाकडे पाहून पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘प्रत्येक स्त्री भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही, तेव्हा तू प्रथम कुंकू कपाळावर लाव, मगच तुझ्याशी बोलतो.’’ झाले, पुरोगाम्यांना पू. भिडेगुरुजी आणि हिंदु धर्मावर टीका करण्याजी एक संधी मिळाली. त्यांनी एकच ओरड चालू केली, ‘पू. भिडेगुरुजी हे महिलाविरोधी आहेत. त्यांनी समस्त स्त्री वर्गाचा अपमान केला आहे. हिंदु धर्मात स्त्रियांना कसे रहायचे ? याचे स्वातंत्र्य नाही.’ खरे तर पू. भिडेगुरुजींनी त्या वार्ताहर महिलेला कुंकू लावण्याची बळजोरी केली नव्हती, तर केवळ सूचना केली होती आणि या देशात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. एका भोंड्या कपाळाच्या महिलेला केवळ एक सूचना केली; म्हणून गदारोळ उठवणारे मात्र इस्लाम धर्मातील स्त्रियांवर तलाक, बुरखा, हिजाब, खतना, हलाल या रूढींच्या माध्यमातून जे अत्याचार होतात, त्यांच्याविरुद्ध एक शब्दही उच्चारण्याचे धैर्य करू शकत नाहीत.
६. उच्चविद्याविभूषित महिलांनी कुंकू लावल्याने कार्यकर्तृत्वात अडथळा कुठे ?
भारताने ‘चांद्रयान-३’द्वारे नुकतेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वी पाऊल ठेवले आणि एक इतिहास घडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाला यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. ही ‘चांद्रयान-३’ची मोहीम यशस्वी करण्यात ज्या भारतातील शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र एक केली, त्या शास्त्रज्ञांमध्ये अनेक महिला शास्त्रज्ञांचा समावेश होता. या महिलांची छायाचित्रे कुंकवावर टीका करणार्यांनी एकदा अवश्य लक्षपूर्वक न्याहाळावीत. या अत्यंत उच्च विद्याविभूषित स्त्रियांनी अंगभर साडी, गळ्यात सौभाग्याचे मंगळसूत्र, कपाळावर ठसठशीत कुंकू लावल्याचे त्यांना दिसून येईल. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रात त्यांच्या कपाळावर कुंकू दिसून येते. प्रसिद्ध संसदपटू आणि विद्वान वक्त्या सुषमा स्वराज यांच्या कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेले असायचे; पण या कुंकवामुळे वरील सर्व स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वात कुठे अडथळा आला नाही.
७. पू. भिडेगुरुजींना वाकून नमस्कार केला; म्हणून सुधामूर्ती यांना लक्ष्य करणारे हिंदुद्वेष्टे !
या तथाकथित पुरोगाम्यांना आणि हिंदुत्वद्वेष्ट्यांना पू. भिडेगुरुजी यांचा मोठेपणा, त्यांचे कार्यकर्तृत्व मान्य तर नाहीच; पण त्यांना कुणी मोठेपणा देत असेल, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करत असेल, तर तेही मान्य नाही. गेल्या वर्षी प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका आणि ‘इन्फोसिस’ या प्रसिद्ध आय.टी. कंपनीचे अध्यक्ष डॉ. नारायणमूर्ती यांच्या पत्नी अन् आता इंग्लंडचे पंतप्रधान असलेले ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधामूर्ती यांची एका कार्यक्रमाच्या वेळी पू. भिडेगुरुजी यांच्याशी भेट झाली. त्या वेळी भारतीय परंपरेप्रमाणे सुधामूर्ती यांनी पू. भिडेगुरुजी यांच्या चरणांना स्पर्श करून खाली वाकून त्यांना नमस्कार केला. झाले, ही वार्ता ऐकताच हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला. त्यांनी एकच गदारोळ करून सुधामूर्ती यांच्यावर टीकास्त्रांचा मारा चालू केला. पू. भिडेगुरुजी यांनी आजपर्यंत किती वादग्रस्त विधाने केली, याचा पाढा वाचला गेला. ‘आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणार्या व्यक्तीच्या पाया पडून त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करणे, त्यांचा आशीर्वाद घेणे, ही भारतीय परंपरा, संस्कृती आणि सभ्यता आहे. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांच्या आशीर्वादामध्ये किती सामर्थ्य आहे, याची या पुरोगामी हिंदुद्वेष्ट्यांना काय कल्पना असणार ?
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.