गडांवर ‘३१ डिसेंबर’चे ‘सेलिब्रेशन’ करण्यास मनाई !

गडांचे पावित्र्य जपण्याचे वन विभागाचे आवाहन !

पुणे – येणार्‍या सलग ३ दिवसांच्या सुट्यांमुळे गड, टेकड्या आणि शहरालगतची वनक्षेत्रे, तसेच अभयारण्यांमध्ये मेजवानी करणार्‍यांवर वन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. उपद्रवी पर्यटकांकडून संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन वन विभागाने गडांच्या पायथ्याला, संरक्षित क्षेत्रांमध्ये मुक्काम करण्यास, तंबू टाकून ‘सेलिब्रेशन’ करण्यास मनाई केली आहे. गडांचे पावित्र्य जपण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरचे ‘सेलिब्रेशन’ शहराबाहेर, निर्मनुष्य ठिकाणी, जंगल परिसरात जाऊन विनाअनुमती मेजवान्या करण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यातून काही अपप्रकार घडल्याचेही लक्षात आले आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाचे कर्मचारी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांसह ताम्हिणी, मुळशी, सिंहगड, लोणावळ्यासह पुण्यातील टेकड्यांवर रात्री गस्त (पहारा) घालणार आहेत.

गडांवर रात्री मुक्काम नको !

सिंहगड, राजगड आणि तोरणा या राज्य संरक्षित गडांवर पर्यटक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. पर्यटकांनी गडावर रात्री मुक्कामी जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्याचे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गडांच्या पावित्र्यासाठी आवाहन करावे लागणे दुर्दैवी !