(म्हणे) ‘माझ्याकडे सापडलेले ३५४ कोटी माझे नाहीत, तर आमच्या आस्थापनाचे !’ – काँग्रेसचे खासदार धीरज साहू

झारखंडमधील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांचे स्पष्टीकरण

काँग्रेसचे खासदार धीरज साहू

रांची (झारखंड) – झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार धीरज साहू यांच्या १० ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घालून ३५४ कोटी रुपये जप्त केले होते. या प्रकरणी १० दिवसांनी खासदार धीरज साहू यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ‘‘हे सर्व पैसे माझे किंवा काँग्रेस पक्षाचे नसून माझे कुटुंबीय आणि आस्थापन यांचे आहेत. ते प्रत्येक गोष्टीचा हिशेब देतील.’’

साहू पुढे म्हणाले की, यात लपवण्यासारखे काही नाही. मी आत्मविश्‍वासाने सांगत आहे की, मी सर्व गोष्टींचा हिशेब देईन. काही दिवस थांबा. मी सर्व काही जनतेसमोर ठेवीन. त्यानंतर मग सर्वांना कळेल की, हा काळा पैसा आहे कि नाही ? आमचा प्रत्येक व्यवसाय माझ्या कुटुंबाच्या नावावर आहे. आम्ही ६ भाऊ आणि त्यांची मुले. प्रत्येकजण व्यवसायाशी संबंधित आहेत. हा १०० वर्षे जुना व्यवसाय आहे. सर्व दारूविक्री रोखीने केली जाते. विक्रीतून मिळालेले हे पैसे आहेत. हा संपूर्णपणे आमच्या आस्थापनाचा पैसा होता. हा पैसा बेकायदेशीर असल्याचे अद्याप आयकर विभागाकडून सांगण्यात आलेले नाही. या संदर्भात मला जेव्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, तेव्हा मी पूर्ण हिशोब देईन.

संपादकीय भूमिका

सरकारी नियमानुसार घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड ठेवता येऊ शकत नसतांना ३५४ कोटी रुपयांची रोकडे घरात ठेवणे, हाच मोठा गुन्हा आहे. जर हा काळा पैसा नाही, तर तो बँकेत का ठेवला नाही ? हा प्राथमिक प्रश्‍न उपस्थित होतो ! त्यामुळे साहू अशा प्रकारचे स्पष्टीकरण देऊन जनतेला आणि आयकर विभागाला मूर्ख बनवू पहात आहेत !