सातारा, १४ डिसेंबर (वार्ता.) – ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’ या गजरामध्ये ५ लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव पार पडला. या वेळी भाविकांकडून रथावर गुलाल-खोबर्याची उधळण करण्यात आली. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक रथोत्सवासाठी येतात. १३ डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस होता. या दिवशी दुपारी २.३० वाजता श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांची उत्सवमूर्ती सालकरी यांच्या निवासस्थानापासून वाजत-गाजत आणून रथामध्ये बसवण्यात आली आणि रथोत्सवास प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा आहे. या वेळी मानकरी, भाविक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अनेक ठिकाणच्या मानाच्या सासनकाठ्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. त्या रथास भेटवण्यात आल्या.