Exclusive : महाराष्ट्र ‘एस्.डी.आर्.एफ्.’च्या आणखी २ पथकांची केंद्राकडे मागणी करणार !

मुंबई, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाकडून केंद्रशासनाकडे आणखी २ ‘राज्य आपत्ती प्रतिसाद दलां’ची मागणी करण्यात येणार आहे. याविषयीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन लवकरच केंद्रशासनाला पाठवणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या एका अधिकार्‍यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

सध्या महाराष्ट्रात नागपूर आणि धुळे या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके वर्ष २०१६ पासून कार्यरत आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एका पथकामध्ये २१२ सैनिक कार्यरत असतात. राज्यात कुठे नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास हे सैनिक सर्वप्रथम साहाय्यासाठी पोचत असतात. महाराष्ट्रात सातत्याने उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींच्या तुलनेत आपत्ती प्रतिसाद दलांची संख्या मर्यादित असल्यामुळे आणखी २ दलांची मागणी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे.

कोकणात आपत्ती प्रतिसाद दलाची अनिश्‍चितीच ! 

यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र नव्याने मागणी करण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलापैकी एक पुणे येथे, तर दुसरे मुंबई येथे प्रस्तावित आहे. यापूर्वी कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्याचा प्रस्ताव वर्ष २०१९ मध्ये राज्य सरकारकडून केंद्रीय गृहविभागाकडे पाठवण्यात आला होता; मात्र हे पथक अन्य राज्यात हलवण्यात आल्याची माहिती एका अधिकार्‍यांनी दिली. नव्याने होऊ घातलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचेही कोकणात स्थान नाही. एकूणच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नैसर्गिक आपत्तींची वारंवारता अधिक असूनही कोकणात आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापनेची अद्यापही अनिश्‍चितीच आहे.