‘आपल्याला देवपूजेसाठी प्रतिदिन कापसाच्या वाती लागतात. पूर्वी घरातील स्त्रिया घरच्या घरी स्वत:च्या हाताने वाती बनवत असत. आताच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना घरात अधिक वेळ देता येत नाही. त्यामुळे पेठेतून (बाजारातून) आयत्या (तयार) वाती आणून त्यांचा उपयोग केला जातो. दिव्यात तेल आणि कापसाची वात घालून तो देवासमोर प्रज्वलित केला जातो. दिव्याच्या ज्योतीमुळे तेजतत्त्व (चैतन्य) आकृष्ट होऊन ते वास्तूत प्रक्षेपित होते. त्यामुळे वातावरणाची शुद्धी होऊन ते सात्त्विक बनते.
स्त्रियांनी घरी हाताने बनवलेल्या वाती, बाजारात तयार मिळणार्या वाती, तसेच सनातन-निर्मित सात्त्विक वाती यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
बाजारातून विकत आणलेल्या वातींमध्ये सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा आणि अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. सौ. सुजाता रेणके आणि त्यांचे नातलग यांनी घरी बनवलेल्या वातींमध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. सनातन-निर्मित वातींमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली. सर्व वातींची निरीक्षणे पुढे दिली आहेत.
टीप १ – श्रीमती ललिता हनुमंत सदरे, शिवमोग्गा, कर्नाटक (सौ. रेणके यांच्या मावशी) यांनी बनवलेल्या वाती गत ११ वर्षांपासून सौ. रेणके यांनी जपून ठेवल्या आहेत.
टीप २ – सौ. रेणके यांनी २ वर्षांपूर्वी सूत काढून हातावर चोळून या वाती बनवल्या आहेत.
टीप ३ – श्रीमती सुलोचना शंकरराव खटावकर, शिवमोग्गा, कर्नाटक (सौ. रेणके यांच्या आई) यांनी बनवलेल्या वाती गत २६ वर्षांपासून सौ. रेणके यांनी जपून ठेवल्या आहेत.
निष्कर्ष
वरील निरीक्षणांतून बाजारातील वातीपेक्षा घरी बनवलेल्या आणि सनातन-निर्मित वाती यांमध्ये अधिक सात्त्विकता (सकारात्मक ऊर्जा) असल्याचे दिसून आले.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. बाजारातून विकत आणलेल्या वातींमध्ये सर्वाधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : बाजारातील वाती या व्यावसायिक हेतूने बनवल्या जातात, तसेच वाती बनवण्याचे ठिकाण, ती बनवणारी व्यक्ती, तेथील वातावरण, वाती भरून ठेवण्याची पद्धत इत्यादी सात्त्विक नसल्यास त्यांवर त्रासदायक आवरण येते. तसेच आजकालचे वातावरण अत्यधिक रज-तमप्रधान असल्याने वस्तूंवर त्रासदायक आवरण येते. त्यामुळे बाहेरून कोणतीही वस्तू घरी आणल्यावर प्रथम तिची शुद्धी करून मगच तिचा उपयोग करावा.
२ आ. सौ. सुजाता रेणके आणि त्यांचे नातलग यांनी घरी बनवलेल्या वातींमध्ये आजही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा टिकून असणे : हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सौ. रेणके आणि त्यांचे नातलग वाती बनवतांना देवाचे नामस्मरण करत भावपूर्णरित्या बनवतात. या तिघी देवासाठी गंध उगाळायला वापरण्यात येणार्या सहाणीवर किंवा हातावर वाती बनवतात. वाती बनवतांना देवाचे नामस्मरण करत त्या बनवल्याने त्या देवतेच्या चैतन्याने भारित होतात. या वातींवर काही प्रमाणात त्रासदायक शक्तींचे आवरण आल्याने त्यांमध्ये थोडी नकारात्मक ऊर्जा आढळून आली.
२ इ. सनातन-निर्मित वातीमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असणे : सनातन-निर्मित वाती सनातनच्या साधिका नामस्मरण करत सात्त्विक ठिकाणी बनवतात. तसेच वाती भरून ठेवण्याची पद्धतसुद्धा नीटनेटकी आहे. या वाती बनवण्याचा उद्देश व्यावसायिक नसून ‘समाजाला सात्त्विकता मिळावी’, हा आहे. यामुळे सनातन-निर्मित वातींमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आहे.
३. वातींची शुद्धी करून मगच त्यांचा देवपूजेत उपयोग करावा !
थोडक्यात वाती बनवतांना त्या हातावर किंवा देवासाठी गंध उगाळायला वापरण्यात येणार्या सहाणीवर देवाचे नामस्मरण करत भावपूर्ण पद्धतीने बनवल्या आणि त्या नीटनेटकेपणाने भरून ठेवल्या, तर त्या सात्त्विक बनतात. त्यांची सात्त्विकता टिकण्यासाठी त्यांची शुद्धी करावी. त्यासाठी त्यांना ऊन दाखवणे किंवा सात्त्विक उदबत्तीच्या धुराने शुद्धी करू शकतो. यामुळे वातींची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता वाढते.’
– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.८.२०२३)
इ-मेल : [email protected]