नागपूर – इस्रायलच्या महिलांची राष्ट्रभक्ती आणि देशासाठीचे योगदान यांतून नारीशक्तीने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. येथील रेशीमबाग येथे २० ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी समारोहात त्या बोलत होत्या. या वेळी बडोदा येथील श्री स्वामीनारायण देव महिला मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. उर्वशी मिश्रा आणि कार्यवाहिका करुणा साठे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
शांताक्का पुढे म्हणाल्या की,
१. इस्रायली महिला स्वतःच्या मुलांना लहानपणापासूनच देशभक्तीचे बाळकडू पाजतात. त्यामुळे तेथील प्रत्येक नागरिक देशभक्त असून ते देशासाठी प्राण पणाला लावण्यास मागे-पुढे पहात नाहीत.
२. इस्रायलचा प्रत्येक नागरिक सैन्य प्रशिक्षण घेतो. त्यामुळेच हमासने ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी इनवा लिबरमन नामक तरुणीने शस्त्रसज्ज होऊन गावातील लोकांच्या साहाय्याने २५ आतंकवाद्यांना ठार केले.
३. भारतातील सनातन धर्मात स्त्री-पुरुष दोन्ही एकच तत्त्व असल्याचे सांगितले आहे. वैदिक काळात स्त्रियांना कर्तृत्वाचे स्वातंत्र्य असल्याची उदाहरणे आहेत; परंतु परकीय आक्रमणांमुळे नंतरच्या काळात महिलांवर काही बंधने आली होती.
४. समाजात महिलांचे शोषण होत असल्याचा अपप्रचार केला जातो. सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरिया यांच्याशी तुलना केली जाते. अशा प्रकारच्या नकारात्मक प्रवाहापासून सावध होण्याची आवश्यकता आहे. महिलांनी अशा भ्रामक प्रचाराचे खंडण करून सत्य गावोगावी पोचवले पाहिजे.
या वेळी त्यांनी समलैंगिक विवाहांच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.