एस्.टी. महामंडळ तोट्यातून बाहेर ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एस्.टी. महामंडळ

  • ‘एस्.टी. कुठे आहे ?’ हे दाखवणारे ‘अ‍ॅप’ महिन्याभरात कार्यान्वित होणार !

  • एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची दैनिक ‘सनातन प्रभात’ला विशेष मुलाखत !

मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) – एस्.टी. महामंडळ तोट्यातून बाहेर पडले आहे. मागील ३ मास कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी महामंडळाला सरकारकडून निधी घ्यावा लागला नाही, अशी महत्त्वाची माहिती एस्.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.

याविषयी सविस्तर माहिती देतांना शेखर चन्ने म्हणाले, ‘‘बसस्थानक, परिसर, बसगाड्या आणि बसस्थानकावरील प्रसाधनगृहे अशा ४ टप्प्यांत बसस्थानकांची स्वच्छता चालू आहे. यांतील प्रत्येक सूत्रासाठी गुण ठेवण्यात आले आहेत. छोटी आणि मोठी बसस्थानके अशा २ भागांत वर्गीकरण करून स्वच्छ बसस्थानकांना पारितोषिक देण्यात येणार आहे. ज्या बसस्थानकांमध्ये कर्मचार्‍यांचा अभाव आहे, त्या ठिकाणी खासगी एजन्सीची नियुक्ती करून स्वच्छता करून घेण्याची सूचना देण्यात आली आहे. यामुळे अस्वच्छतेसाठी कोणतेही कारण देता येणार नाही. प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यावर आम्ही भर देत आहोत.’’ यांसह १८० बसस्थानकांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे, अशी माहितीही चन्ने यांनी दिली.

एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेली माहिती !

एस्.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने

७० व्यावसायिकांनी एस्.टी. बसस्थानकांच्या स्वच्छतेचे दायित्व घेतले !

एस्.टी. महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाने प्रथमच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’ या नावाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या दृष्टीने राज्यातील बसस्थानके, त्यांचा परिसर आणि बसगाड्या यांच्या स्वच्छतेचे काम महामंडळाने युद्धपातळीवर चालू केले आहे. याविषयी शेखर चन्ने यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेली माहिती पुढे देत आहोत.

‘चकोते बेकरी’च्या मालकांनी २३ बसस्थानकांच्या स्वच्छतेचे दायित्व घेतले !

‘कोल्हापूर येथील ‘चकोते बेकरी’च्या मालकांनी कोल्हापूर येथील २३ बसस्थानकांच्या स्वच्छतेचे पालकत्व घेतले आहे. यासह कोल्हापूरच्या बाहेरील काही  बसस्थानकांच्या स्वच्छतेचे दायित्वही त्यांनी घेतले आहे. बसस्थानकांच्या स्वच्छतेचे दायित्व देतांना त्यांना व्यावसायिक दृष्टीने लाभ होण्यासाठी बसस्थानकांवर त्यांच्या उत्पादनांचे विज्ञापन करण्याची अनुमती देण्यात आली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील ७० उद्योजक आणि व्यावसायिक यांनी बसस्थानकांचे पालकत्व घेतले आहे. यामुळे बसस्थानकावरील स्वच्छतेचा भार अल्प होईल’, असे चन्ने म्हणाले.

राज्यातील १८० बसस्थानकांचे काँक्रिटीकरण होणार !

‘पावसाळ्यात बसस्थानकांत मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. या खड्ड्यांतून बस चालवणे अवघड होते. त्यामुळे राज्यांतील बसस्थानकांतील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बसस्थानकांच्या काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील महत्त्वाच्या १८० बसस्थानकांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ‘यामुळे बसस्थानकांवरील खड्ड्यांची समस्या सुटेल’, असे शेखर चन्ने यांनी सांगितले.

नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण २० वरून ७ टक्क्यांपर्यंत आणण्यात यश !

यापूर्वी एस्.टी. महामंडळाच्या एकूण गाड्यांपैकी ८० टक्केच गाड्या रस्त्यावर, तर उर्वरित २० टक्के गाड्या नादुरुस्त असायच्या. एस्.टी. महामंडळाच्या तोट्याचे हेही एक कारण आहे. त्यामुळे नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण अल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. सद्य:स्थितीत नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण ७ टक्क्यांपर्यंत आणण्यात आम्हाला यश आले आहे. नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण न्यूनतम ८ टक्के असावे; मात्र हे प्रमाण ४ टक्क्यांपर्यंत आणण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.

विशिष्ट संकल्पना ठरवून बसस्थानकांची रंगरंगोटी करणार !

बसस्थानकांची रंगरंगोटी करणे, बसस्थानकांच्या परिसरात झाडे लावणे अशा प्रकारे बसस्थानकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. विशिष्ट संकल्पना निश्‍चित करून बसस्थानकांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. बसस्थानकांची रंगरंगोटी करण्यासाठी काही सामाजिक संघटनांचे सहकार्यही लाभत आहे.

बसगाड्या वेळेत सोडण्याला प्राधान्य देत आहोत !

चालक आणि वाहक वेळेत उपलब्ध नसणे, गाडी नादुरुस्त असणे, आधीच्या प्रवासाला गेलेली गाडी वेळेत न येणे, गाडी ‘ब्रेकडाऊन’ होणे आदी कारणांमुळे गाड्या सुटण्यास विलंब होतो. बसगाड्या वेळेत नसल्यामुळे प्रवासी एस्.टी. पासून दुरावतात. त्यामुळे बसगाड्या वेळेवर सुटण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. प्रत्येक मासाला बसस्थानकातून गाड्या सुटण्याचे वेळापत्रक पडताळण्यात येत आहे.

बसस्थानकांच्या उपहारगृहात दर्जेदार पदार्थ मिळायला हवेत !

बसस्थानकांवरील उपाहारगृहांच्या दुरवस्थेविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना शेखर चन्ने म्हणाले, ‘‘आमचा प्रवासी हा श्रीमंत वर्गातील नाही. त्यामुळे बसस्थानकातील उपाहारगृहात महागडे पदार्थ ठेवायला हवेत, असे नाही; मात्र जे पदार्थ असतील, ते दर्जेदार असायला हवेत. आमचा व्यावसायिक हेतू नाही, तर प्रवाशांचे समाधान व्हायला हवे. सध्या मात्र बसस्थानकांच्या स्वच्छेतवर आम्ही भर देत आहोत. उपाहारगृहाच्या दृष्टीने भविष्यात स्थानिक पातळीवरील पदार्थ उपाहारगृहांत उपलब्ध करून देणे, तसेच दर्जेदार  पदार्थ ठेवणे याविषयी आम्ही निश्‍चित विचार करू.

एस्.टी. कुठे आहे आणि किती आसने उपलब्ध आहेत ? हे ‘अ‍ॅप’द्वारे कळणार !

‘एस्.टी. कुठे आहे ?’ आणि ‘गाडीत किती आसने उपलब्ध आहेत ?’, याची माहिती देणारे ‘अ‍ॅप’ येत्या महिन्याभरात कार्यान्वित होईल. यासह एस्.टी. तिकीट ‘ऑनलाईन’ काढण्याचे ‘अ‍ॅप’ही कार्यान्वित होणार आहे. ही दोन्ही ‘अ‍ॅप’ आम्ही एकत्र करणार आहोत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि नागरिक पुन्हा एस्.टी. कडे वळण्यास साहाय्य होईल, अशी महत्त्वाची माहिती शेखर चन्ने यांनी दिली.